
मुंबईमध्ये बुधवारी मध्यरात्रीपासून झालेला पाऊस हा गेल्या दहा वर्षात ऑक्टोबर महिन्यात दुसऱयांदा पडलेला सर्वाधिक पाऊस होता अशी नोंद हवामान खात्यात झाली आहे. आज सायंकाळीही मुंबईसह कोकणपट्टीत मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारीही या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
मुंबईत 144.8 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली. यापूर्वी 2012 च्या ऑक्टोबर महिन्यात 197.7 मि. मी. पाऊस झाला होता. मुंबईत ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागांमध्ये काही ठिकाणी पाणी साचले होते. मात्र सकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर ते ओसरले.
वरळी येथे सर्वाधिक 110 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली. त्यानंतर नवी मुंबई (101 मि. मी.) आणि माझगाव (97.2 मि. मी.) असा पाऊस नोंदला गेला. मुंबईच्या ऊर्वरित भागांमध्ये 50 मि. मी. ते 85 मि. मी. पावसाची नोंद झाली. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्याच्या प्रभावामुळे पुढील 24 तासांत जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.






























































