मुंबईचा ‘श्वास’ कोंडतोय, पण घटनाबाह्य सरकार ढिम्म; आदित्य ठाकरेंचा मिंधे सरकारवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहर व उपनगरांतील थंडी हळूहळू कमी होत असतानाच प्रदूषित हवेने मुंबईकरांची झोप उडवली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) वारंवार ढासळत आहे. यावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मिंधे सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. यावेळी मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स ट्विट करत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘गेल्या तीन महिन्यांप्रमाणेच, मुंबई आणि महानगर प्रदेशातील भयानक AQI दर्शविणारा हा अजून एक दिवस’.

राज्याला पूर्णवेळ पर्यावरण मंत्री नसल्याच्या मुद्द्यावर देखील त्यांनी यावेळी बोट ठेवलं. तसंच राज्यात पर्यावरणाच्या हिताची कोणती योजना नसल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. आपल्या पुढल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, ‘पूर्णवेळ पर्यावरण मंत्री किंवा पर्यावरण हिताची कोणतीही योजना नसलेल्या घटनाबाह्य सरकारकडून या विषयावर मौन राखण्याचा अजून एक दिवस’.

आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री राहिले होते. त्यावेळी त्यांनी उचललेल्या पावलांची आठवण यावेळी करून दिली. पर्यावरण मंत्री या नात्याने मी राज्यभर हवामान बदलावर कृती करणारे धोरण राबवल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमधून सांगितलं आहे.

‘घटनाबाह्य सरकार सत्तेत असताना पर्यावरण बदल कृती आराखडा अडगळीत टाकला गेलाय, रोजचा दिवस वाढलेल्या प्रदुषणाचा येतोय आणि सरकार मात्र ढिम्म आहे’, अशा शब्दात त्यांनी मिंधे सरकारला सुनावले.

मुंबईसाठी आम्ही हवामान बदल कृती आराखडा मुंबई महापालिकेच्या माध्यमातून व ‘c40cities’ यांच्या साथीने तयार केला होता, पण तोही बाजूला पडलाय मुंबईला आवश्यक असलेल्या हवामान बदल कृतीच्या प्रत्येक पैलूचा तपशीलवार अभ्यास त्यात होता त्याचप्रमाणे पुणे सोलापूर आणि इतर शहरांसाठीही आम्ही काम केले होते, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.