
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. प्रवाशांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेकडो प्रवाशांची फ्लाईट हुकली.
कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासी संख्येत वाढ होत आहे. आज सकाळी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वरच्या गर्दीने कळस गाठला. विमानतळाचे प्रवेशद्वार आणि चेक इन काउंटरवर कमी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याने लांबलचक रांगा लागल्या. हळूहळू या रांगा इतक्या वाढल्या की, विमान सुटण्याची वेळ झाली तरी प्रवाशांना आत प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे प्रवासी चिडले. त्यातच मुंबई – हैदराबाद विमानातील 15 हून अधिक प्रवासी वेळेवर न पोचल्याने त्यांचे विमान ‘मिस’ झाले. त्यामुळे गोंधळलेल्या प्रवाशांनी धावाधाव सुरू केली. त्यामुळे काही काळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती झाली.
सणांमुळे प्रवासी वाढले
सणांमुळे प्रवासी वाहतुकीत वाढ झाली आहे. मुंबई विमानतळाप्रमाणेच देशातील इतर विमानतळांवरही असेच अनुभव आले आहेत. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्वाची आहे. तसेच विमानतळावरील प्रक्रिया लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. शिवाय कोरोनासंदर्भात सरकारने जारी केलेल्या नियमांचे पालन करण्यात येत असून आज प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो, असे निवेदन विमानतळ प्रशासनाने जारी केले.





























































