तिरंदाजीसाठी सर्वस्व पणाला लावीन! अमरावतीचा युवा तिरंदाज सुखमणी बाबरेकरचे उद्गार

284

वयाच्या दहाव्या वर्षापासून तिरंदाजीत हात आजमावणाऱया अमरावतीच्या 21 वर्षीय सुखमणी बाबरेकर याने आतापर्यंत चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हिंदुस्थानसाठी जीवाचे रान करीत पदकांवर मोहोरही उमटवलीय. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आर्मीकडून त्याला नोकरीचा प्रस्तावही आला होता, पण आता त्याला फक्त तिरंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. समीर म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला या खेळामध्ये मोठी झेप घ्यायचीय. त्यामुळे त्याने हा प्रस्ताव स्वीकारला नाही. या खेळासाठी सर्वस्व पणाला लावत मराठमोळ्या खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकायचेय. हेच स्वप्न त्याने बघितलेय. यावेळी दैनिक ‘सामना’ने त्याच्याशी संवाद साधला. याप्रसंगी त्याने विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली.

वडिलांनी कर्ज काढून धनुष्यबाण आणला

इयत्ता नववीमध्ये शिकत असताना माझ्या वडिलांनी कर्ज काढून माझ्यासाठी धनुष्यबाण आणला. याची किंमत होती जवळपास दीड लाख. परदेशातून हा धनुष्यबाण माझ्या वडिलांनी मागवला होता. त्यानंतर क्रीडा प्रबोधिनीमध्ये रुजू झालो. तिथपासून वैयक्तिक खर्च करून उपकरणे घेण्याची गरज पडली नाही. आपला खेळ उत्तम झाल्यास सर्व सुविधा तेथे उपलब्ध होत असतात, असे सुखमणी बाबरेकर स्पष्टपणे सांगतो.

चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव

मी आतापर्यंत चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. 2016मध्ये सेऊल येथे झालेल्या युथ आर्चरी स्पर्धेत कास्य पदक जिंकले. त्यानंतर 2017 साली बँकॉक येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्याच वर्षी अर्जेंटिना येथे झालेल्या युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकावर मोहोर उमटवली. 2018 सालामध्ये तैवान येथे झालेल्या आशिया कपमध्ये दोन रौप्य पदके जिंकली, अशी माहिती सुखमणी बाबरेकर याने यावेळी दिली.

इयत्ता पाचवीत तिरंदाजीचा श्रीगणेशा

फातिमा कॉन्व्हेण्ट हायस्कूलमध्ये माझे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर केएल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेत आहे. आता बीकॉमच्या दुसऱया वर्षाचे शिक्षण घेत आहे. इयत्ता पाचवीपासून तिरंदाजीचा सराव करतोय. समीर म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली मला या खेळाचे कसब आत्मसात करता आले. तिरंदाजीत धनुष्यबाण घेऊन आपल्याला निशाणा साधायचा असतो. हा खेळ नवीन वाटला. सुरुवातीला कुतूहलाने याकडे वळलो, नंतर प्रेमात पडलो, असे सुखमणी बाबरेकर यावेळी आवर्जून सांगतो.

टेरेसवर तिरंदाजीचा सराव

ऑलिम्पिकसाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते, पण मार्च महिन्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे खेळाडूंना आपापल्या घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मी अमरावतीतील परतवाडाच्या घरी आलो, पण या कालावधीतही मी फिटनेस व तिरंदाजीचा सराव केला. घरी डम्बेल्स होते. त्यामुळे शारीरिक क्षमतेवर लक्ष देता आले. तसेच पहाटे लवकर उठून रनिंगचाही सराव केला. टेरेसवर तिरंदाजीचा सराव करता आला, असे सुखमणी बाबरेकर पुढे म्हणतो.

आपली प्रतिक्रिया द्या