
123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपत्रातून मुंबै बँकेचे अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दरेकर तसेच बँकेच्या अन्य संचालकांची नावे वगळण्यात आली आहेत.
मुंबै बँकेचे अध्यक्ष, संचालक व अन्य पदाधिकाऱ्यांनी पदांचा दुरुपयोग करून बनावट कागदपत्रांच्या आधारे 123 कोटींचा घोटाळा केला. 172 कोटी रुपये मूल्याचे कर्जरोखे 165 कोटी 44 लाखांना विकून बँकेचे सहा कोटी 60 लाखांचे नुकसान केले’, हे आणि अशा अनेक आरोपांची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती. त्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने मार्च 2015 मध्ये गुन्हा दाखल केला होता. मात्र गुह्याचा तपास करून आर्थिक गुन्हे शाखेने जानेवारी-2018 मध्ये न्यायालयात एक अहवाल सादर करून प्रकरण बंद करण्याची विनंती केली होती. परंतु तक्रारदार पंकज कोटेचा यांनी पोलिसांच्या अहवालाविरोधात एक याचिका दाखल केली होती. ती याचिका ग्राह्य धरून न्यायालयाने 16 जूनला पोलिसांचा अहवाल फेटाळला.
दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात सोमवारी आरोपपत्र दाखल करून दहा मजूर संस्थांना आरोपी केले आहे. पण प्रवीण दरेकर आणि अन्य संचालकांची नावे आरोपपत्रात समाविष्ट नाहीत.


























































