
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बोगस मजूर प्रकरणी पोलिसांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दुसऱयांदा नोटीस बजावत सोमवार 11 एप्रिल रोजी माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधी 4 एप्रिल रोजी दरेकर यांची पोलिसांनी चार तास चौकशी केली होती.
मुंबई बॅकेत अध्यक्ष असताना प्रवीण दरेकर यांनी दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. तसेच ते गेली 20 वर्षे मजूर असल्याचे दाखवून मुंबई बँकेवर निवडून येत आहेत. त्याच्या या बोगसगीरीविरोधात आणि आर्थिक गैरव्यवहाराबाबत आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी 4 एप्रिल रोजी दरेकर यांची चार तास चौकशी केली होती. तसेच गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल असेही पोलिसांनी बजावले होते. त्यानुसार आज पोलिसांनी प्रवीण दरेकर यांनी नोटीस बजावली आहे.































































