
शनिवारी आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप जलशुद्धीकरण संकुलात बोरिवली राष्ट्रीय उद्यानातून येणाऱया पाण्याचा लोंढा घुसल्यामुळे मुंबईला होणारा पाणीपुरवठा रविवारी ठप्प झाला. त्या पार्श्वभूमीवर भांडुप जलशुद्धीकरण संकुलात उद्यानातून येणारे पाणी घुसू नये यासाठी मुंबई महापालिका संकुलाभोवती पूरप्रतिबंधक भिंत बांधणार आहे. त्याचबरोबर हे पाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असणाऱया तुळशी तलावाकडे वळवण्यासाठी विशेष प्रवाह मार्ग बांधण्यात येणार आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी आज संकुलाची पाहणी केल्यानंतर याबाबत निर्देश दिले.
मुंबईत शनिवार, 17 जुलैच्या रात्रीपासून ते रविवार, 18 जुलै सकाळपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे भांडुप जलशुद्धीकरण संकुलामध्ये पावसाचे पाणी शिरून झालेल्या नुकसानीची पाहणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी केली. संपूर्ण संकुलाभोवती पूर प्रतिबंधक भिंत बांधणे, संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरातून येणारे पुराचे पाणी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तुळशी तलावाकडे वळते करण्यासाठी विशेष प्रवाह मार्ग बांधण्याची विनंती उद्यान प्रशासनाकडे करून अनेक निर्देश वेलरासू यांनी दिले. पावसाचे पाणी नेमके संकुलात कसे शिरले, संयंत्रे दुरुस्ती करताना प्रत्यक्षात काय अडथळे जाणवले याबाबतची संपूर्ण माहिती उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर यांनी वेलरासू यांना दिली.
आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प
भांडुप जलशुद्धीकरण संकुल हा संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा असा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. संपूर्ण मुंबई महानगराच्या पाणीपुरवठय़ापैकी सुमारे 65 टक्के पाण्याचे शुद्धीकरण या एकटय़ा प्रकल्पामध्ये केले जाते. संकुलातील दोनपैकी एका जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 1 हजार 910 दशलक्ष लिटर तर दुसऱया प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 900 दशलक्ष लिटर इतकी आहे.



























































