
सामना प्रतिनिधी। मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील राजकीय इच्छा-आकांक्षा, हेवेदावे व संतापाचा विस्फोट होऊ लागल्याचे प्रत्यंतर सोमवारी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट न दिल्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या एका जिल्हा उपाध्यक्षाने मुख्यमंत्र्यांपासून दूर ठेवायची सुपारी घेतली आहे का, असा सवाल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच एका पोलिसाला केला तर दुसरीकडे सुजय विखे-पाटलांच्या प्रवेशाला विरोध करीत भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपच्या कार्यालयात पदाधिकाऱयांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आदी नेते उपस्थित होते. या बैठकीला राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून पदाधिकारी आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱयांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक होती, पण तरीही आगामी विधानसभा निवडणुकीमधील उमेदवारी डोळ्यांसमोर ठेवून असंख्य कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. प्रत्येकाला मुख्यमंत्र्यांना भेटण्याची घाई होती. प्रत्येकजण मुख्यमंत्र्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करीत होता.
पोलीसही नरमले
पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या दालनात मुख्यमंत्री चर्चा करीत बसले होते. पुण्याचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. नितीन भामे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना रोखताच ऍड. भामे संतप्त झाले. हे भाजपचे ऑफिस आहे. कार्यकर्त्यांना रोखण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आम्हाला रोखू नका. सुपारी घेऊन काम करता? कार्यकर्त्यांपासून मुख्यमंत्र्यांना तोडण्याची अजित पवारांकडून सुपारी घेतली आहे काय, असा आरडाओरडा सुरू केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच हा प्रकार घडल्यामुळे पोलीसही नरमले.
जोरदार घोषणाबाजी
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे-पाटील भाजपच्या वाटेवर आहेत, पण भाजपचे नगरमधील खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी सुजय पाटील यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करीत वसंत स्मृती इमारतीच्या खाली घोषणाबाजी केली.






























































