24 वॉर्डमध्ये खड्डे बुजवण्यासाठी संयुक्त पथके; विभाग कार्यालये, रस्ते विभागाच्या समन्वयातून कार्यवाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डय़ांची समस्या अधिक वेगाने निकाली काढण्यासाठी वॉर्ड कार्यालये आणि रस्ते विभागाच्या समन्वयातून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या 24 वॉर्ड कार्यालये आणि रस्ते विभागाची संयुक्त पथके तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत पालिकेने 33 हजार 156 खड्डे बुजवले आहेत.

मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना शिक्षण, आरोग्य, पाणी यांसारख्या मूलभूत सेवासुविधा अत्यंत माफक दरात देत असते. वर्षांचे बाराही महिने पालिका रस्त्यांबाबत जागरूक असते. मात्र, पावसाळ्यात पाण्यामुळे खड्डे पडतात. याबाबत योग्य तो समन्वय साधून पडलेले खड्डे लवकर बुजवण्यासाठी आता पालिकेच्या 24 विभाग कार्यालये आणि रस्ते विभागाची संयुक्त पथके तैनात केली जाणार आहेत. दरम्यान, महापालिपेने 9 एप्रिल ते 11 सप्टेंबर 2021 या सहा महिन्यांच्या कालावधीत मुंबईतील एकूण 33 हजार 156 खड्डे बुजवले आहेत. त्यासाठी महानगरपालिकेच्या वरळीमधील अस्फाल्ट प्लांट येथे निर्मित केलेले सुमारे 2,750 मेट्रिक टन कोल्डमिक्स 24 विभाग कार्यालयांना वितरित केले.

रस्त्यांवर पडणाऱया खड्डय़ांवर प्रत्येक वॉर्ड कार्यालयाचे लक्ष असते. त्याचबरोबर कंत्राट संपलेल्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम हे वॉर्ड कार्यालयाचे असते. त्यासाठी कंत्राटदार नेमलेले आहेत. काही वेळा खड्डे बुजवल्याची माहिती नीट मिळत नाही किंवा खड्डे बुजवण्याच्या कामात दिरंगाई होते. पण आता खड्डय़ांवर देखरेखीचे काम करण्यासाठी वॉर्डचे कर्मचारी आहेत त्याचबरोबर महापालिकेचे हे संयुक्त पथक समन्वयाचे काम करणार आहे. त्यामुळे खड्डय़ांवर दोघांचेही लक्ष राहणार आहे. – राजेंद्र तळकर, प्रमुख अभियंता, रस्ते, पूल, वाहतूक