मार्चमध्ये पालिकेकडून 2,425 कोटींची विक्रमी वसुली, शिल्लक वसुली मेअखेरपर्यंत करण्याचे उद्दिष्ट

महापालिकेने या वर्षी मार्चच्या एकाच महिन्यात तब्बल 2 हजार 425 काटींची वसुली केली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात एकाच महिन्यात केलेली ही विक्रमी वसुली आहे. पालिकेने या वर्षी 31 मार्चपर्यंत साडेचार हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. यातील 3 हजार 195 कोटी आतापर्यंत रक्कम जमा झाली असून शिल्लक 1 हजार 305 कोटींची रक्कम मेअखेरपर्यंत वसूल करण्याचे उद्दिष्ट आता पालिकेने ठेवले आहे.

राज्य सरकारने 15 फेब्रुकारी 2024 रोजी मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, 2024 राजपत्रात प्रसिद्ध केला. यानंतर करनिर्धारण व संकलन विभागामार्फत भांडवली मूल्यांत व मालमत्ताकरांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ न करता आर्थिक वर्ष 2023-2024 ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी 2024 अखेरीस निर्गमित केली. यानंतर पालिकेने वेगाने वसुली करताना 3 हजार 195 कोटींची रक्कम जमा केली. तर अधिनियमातील कायदेशीर तरतुदीनुसार मालमत्ताधारकांना कर भरणा करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी देणे अनिवार्य आहे. यानुसार सन 2023-2024 चा मालमत्ता कर भरण्याचा अंतिम कालावधी 25 मे 2024 पर्यंत आहे.

अजून 5 लाख 44 हजार थकबाकीदार

– पालिका हद्दीत एकूण मालमत्तांची संख्या 9 लाख 55 हजार 38 इतकी आहे. यापैकी 500 चौरस फूट (46.45 चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱया निवासी इमारती / निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. या मालमत्तांची संख्या 3 लाख 56 हजार 652 इतकी आहे.

– त्यामुळे 5 लाख 98 हजार 386 मालमत्ता कर आकारणी कक्षात येतात. 2023-24 मध्ये 2 लाख 53 हजार 605 मालमत्ताधारकांनी 3 हजार 197 कोटी 33 लाख रुपयांचा कर भरणा केला आहे. उर्वरित 3 लाख 44 हजार 781 मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरणा केलेला नाही.

चार वर्षांतील मार्चमधील वसुली

2020-21 730 कोटी रुपये
2021-22 1 हजार 388 कोटी रुपये
2022-23 1 हजार 179 कोटी रुपये
2023-24 2 हजार 425 कोटी रुपये