
कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम अंतर्गत, पात्र व्यक्तिंना मिळून 1 कोटी पहिल्या मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगराने गाठला आहे. या कामगिरीमध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावरील कोविड लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती होण्याच्या आतच विक्रमी वेळेत मुंबईने ही कामगिरी बजावली आहे. मुंबईत आजवर कोविड लसीची पहिली आणि दुसरी अशा दोन्ही मात्रा मिळून सुमारे 1 कोटी 81 लाखांपेक्षा अधिक लशी देण्यात आल्या आहेत. एकूण दोन कोटी मात्रांचा टप्पा गाठण्याकडे मुंबईची वेगाने वाटचाल सुरु आहे.
मुंबईसह देशभरात दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी कोविड – 19 प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरु झाली. टप्प्या-टप्प्याने या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱयांसाठी लसीकरण सुरु झाले. त्यानंतर आघाडीवरील (फ्रंटलाईन) कर्मचाऱयांसाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2021; 60 वर्ष वयावरील तसेच 45 ते 59 वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी दिनांक 1 मार्च 2021; 45 वर्ष वयावरील सर्व नागरिकांसाठी दिनांक 1 एप्रिल 2021; 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी दिनांक 1 मे 2021 पासून लसीकरण सुरु करण्यात आले. नुकतेच दिनांक 3 जानेवारी 2022 पासून वयवर्ष 15 ते 18 वयोगटातील नवयुवकांचे देखील लसीकरण सुरु झाले आहे.
मुंबई महानगरात वेगाने व अधिकाधिक नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध समाज घटकांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन विशेष लसीकरण सुरु करण्यात आले. लसीकरण केंद्रांवर जास्त वेळ रांगेत उभे रहावे लागू नये म्हणून दिनांक 4 मे 2021 पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह-इन लसीकरण सुरु करण्यात आले. स्तनदा मातांसाठी दिनांक 26 मे 2021 पासून तर विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी अथवा नोकरी / व्यवसायासाठी जाणाऱयांकरीता दिनांक 1 जून 2021 पासून लसीकरण राबविण्यात येत आहे. शारीरिक व मानसिकरित्या दुर्बल व्यक्तिंसाठी दिनांक 23 जून 2021; गर्भवती स्त्रियांसाठी आणि शासकीय ओळखपत्र नसलेल्या नागरिकांसाठी दिनांक 14 जुलै 2021 पासून लसीकरण हाती घेण्यात आले. तर, वैद्यकीय कारणांनी व वयोमानाने अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन दिनांक 2 ऑगस्ट 2021 पासून लसीकरण राबविण्यात येत आहे.
यासोबतच, दिव्यांग व्यक्ती, आदिवासी बांधव, कारागृहांमधील बंदिवान, एलजीबीटी समुदायातील नागरिक इत्यादींसाठी विशेष केंद्र, फक्त महिलांसाठी राखीव विशेष लसीकरण सत्र, शिक्षक आणि 18 वर्ष वयावरील विद्यार्थी यांच्यासाठी राखीव सत्र, फक्त दुसरा डोस देय असणाऱया नागरिकांसाठी राखीव सत्र अशा निरनिराळ्या उपाययोजना महानगरपालिकेने केल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचून सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर आहे. समाजातील कोणताही घटक लसीकरणातून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता प्रशासन घेत आहे.
लसीकरणाची व्याप्ती व वेग वाढवल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. यामध्ये पहिल्या मात्रेचा विचार करता, दिनांक 31 मे 2021 रोजी 25 लाख, दिनांक 19 जुलै 2021 रोजी 50 लाख, दिनांक 15 सप्टेंबर 2021 रोजी 75 लाख आणि आज दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी दुपारअखेर 1 कोटी मात्रा देण्याचा टप्पा गाठला गेला आहे.
पहिली आणि दुसरी मात्रा यांचा एकत्रित विचार करता, दिनांक 5 मे 2021 रोजी 25 लाख, दिनांक 26 जून 2021 रोजी 50 लाख, दिनांक 7 ऑगस्ट 2021 रोजी 75 लाख, दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी 1 कोटी मात्रा देण्याचा टप्पा गाठला गेला. त्यानंतर, दिनांक 28 सप्टेंबर 2021 रोजी 1 कोटी 25 लाख, दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी 1 कोटी 50 लाख लसीकरण पूर्ण झाले आहे. आज 5 जानेवारी 2022 रोजी दुपारअखेर 1 कोटी 81 लाखांहून अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे.
मुंबई महानगरात 18 वर्षांवरील नागरिकांचा विचार करता, एकूण 92 लाख 36 हजार 500 मुंबईकरांना दोन्ही लसी देवून लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले आहे. त्या तुलनेत, 99 लाख 80 हजार 629 नागरिकांना पहिल्या मात्रा आज दुपारअखेर दिल्या गेल्या आहेत. निर्धारित लक्ष्यांकाच्या तुलनेत हे प्रमाण 108 टक्के इतके आहे. तर दुसऱया मात्रा 88 टक्के म्हणजे 81 लाख 37 हजार 850 इतक्या नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
मुंबई महानगरात 15 ते 18 वर्ष वयोगटाचा विचार करता, राज्य शासनाने 6 लाख 12 हजार 461 नवयुवकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट नेमून दिले आहे. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने 2021 च्या अंदाजित लोकसंख्येच्या आधारावर सुमारे 9 लाख 22 हजार नवयुवकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी या वयोगटाचे लसीकरण सुरु झाले असून आतापर्यंत सुमारे 15 हजार 110 नवयुवकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे.
सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस वेळेत घ्यावेत, विशेषतः दुसरी मात्रा देय असलेल्यांनी वेळेत डोस घेवून लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी केले आहे.

































































