
पालिकेतील 341 कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीला मुदतवाढ मिळावी म्हणून स्थायी समितीने भरतीबाबतचा प्रस्ताव राखून ठेवला असताना सोमवारी या पदांसाठी पालिका प्रशासनाने नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेतली. त्यामुळे पालिका प्रशासनाने मनमानीपणे कारभार केल्यामुळे निश्चितच जाब विचारणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
कनिष्ठ अभियंत्यांच्या 341 पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी केली होती. निवडणूक आचारसंहिता काळात ही भरती प्रक्रिया राबवल्यामुळे अनेक पात्र उमेदवार या भरतीपासून वंचित राहणार असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी भरती प्रक्रियेची मुदत 15 दिवसांनी वाढवण्याची मागणी केली होती. मात्र कनिष्ठ अभियंत्यांची पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याने पूर्वनियोजित दिवशी परीक्षा घेण्यात येईल, असे पालिकेच्या नगर अभियंता विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. यामुळे संतप्त स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ भरती प्रकियेचा प्रस्ताव राखून ठेवला होता. तरीदेखील पालिका प्रशासनाने नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सोमवारी ही परीक्षा आयआयटी मुंबई येथे पार पडली. दरम्यान, स्थायी समितीच्या अधिकाराकरच गदा आणण्याचा हा प्रकार असल्याचे विरोधी पक्षनेता रवी यांनी म्हटले असून याबाबत प्रशासनाला जाब विचारणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.



























































