
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे कोरोनासारख्या अनेक आजारांना निमंत्रण ठरत असल्याने अशा ‘पिचकारी’ बहाद्दरांना सध्या 200 रुपये करण्यात येणारा दंड 1200 रुपयांपर्यंत वाढवण्यास आज महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली.
मुंबईत सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास 200 रुपये दंड आणि थुंकणाऱयांकडूनही 200 रुपये दंड आकारण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच महापालिकेला ‘कायद्यात तरतूद असताना सार्वजनिक ठिकाणी, उघडय़ावर थुंकणाऱयांकडून 1200 रुपयांचा दंड का आकारत नाही’ असा सवाल केला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने 200 रुपयांचा दंड 1200 करण्याचा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला होता. त्याला आज मंजुरी देण्यात आली.
सात महिन्यांत 28 लाखांचा दंड
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱयांवर महापालिकेद्वारे दंडात्मक कारवाई सुरू असून गेल्या सुमारे सात महिन्यांत 14 हजारांपेक्षा अधिक व्यक्तींकडून 28 लाख 67 हजार 900 इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्याबरोबरच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. दरम्यान, रहिवाशांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत आणि दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.


























































