
पालिकेच्या शाळेत दिसणारा फळा लवकरच इतिहासजमा होणार असून फळ्याच्या जागी अत्याधुनिक डिजिटल बोर्ड झळकणार आहे. यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू केली असून पहिल्या टप्प्यात तब्बल 1300 वर्ग डिजिटल करण्यात येणार आहेत. यासाठी पालिका 36 कोटी 79 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. या डिजिटल बोर्डमुळे शिक्षकांना खडूच्या धुळीपासून होणाऱया आजारांना आळा बसणार आहे.
पालिकेच्या शाळांमध्ये मुंबईतील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जात आहे. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून तब्बल 27 शालेय वस्तूही मोफत पुरवल्या जात आहेत. पालिका शाळेचे शिक्षण अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या अर्थसंकल्पात डिजिटल वर्ग तयार करण्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली होती. यानुसार डिजिटल बोर्ड सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल, यूपीएस लर्निंग, मल्टिमीडिया अशा सुविधा राहणार आहेत. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे डिजिटल वर्ग तयार करण्यात येत आहेत. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.
‘दृकश्राव्य’तेमुळे विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढणार
हिमालयाचा भूगोल शिकवताना प्रत्यक्ष हिमालयच फळ्यावर दिसणार आहे. असे हे डिजिटल बोर्ड असतील. विशेष म्हणजे शिक्षकांना प्रामुख्याने खडूच्या धुळीचा त्रास होऊन होणाऱया अॅलर्जीच्या आजारांना आळा बसणार आहे. या प्रस्तावानुसार कंत्राट मिळाल्यानंतर सहा महिन्यांत 1300 वर्गांमध्ये डिजिटल वर्ग तयार करणे संबंधित कंत्राटदाराला बंधनकारक राहणार आहे. तसेच हे फळे किमान पाच वर्षे टिकतील असे बनवण्यात येणार आहेत. 65 इंचाचे स्क्रीन, 50 गिगाबाईट मेमरी, 4 गिगाबाईट रॅम या डिजिटल फळ्यांची क्षमता असणार आहे.
मुंबईत कोरोना नियंत्रणात आल्यामुळे सोमवारपासून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र कोरोना अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. याची जाणीव करून देण्यासाठी मैदानात खेळायला आलेल्या मुले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या ‘मिकी माऊस’ने मास्क, सॅनिटायझर वापरा, सुरक्षित अंतर पाळा असा संदेश दिला.


























































