दोन सदस्यांना बैठकीसाठी परवानगी असताना भाजप सदस्यांचा स्थायी समितीत गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई उच्च न्यायालयाने भाजपच्या केवळ दोन सदस्यांना स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची परवानगी दिल्याचे पालिकेच्या कायदा अधिकाऱयाने सांगूनही भाजपच्या सर्व सदस्यांनी आज बैठक हॉलमध्ये घुसून गोंधळ घातला. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार ‘त्या’ दोन सदस्यांना बैठकीला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे भाजप सदस्यांचा ‘गोंधळ’ म्हणजे नाहक राजकारण असल्याचा टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी लगावला.

मुंबईत कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे सरकार आणि पालिका प्रशासनाच्या निर्देशानुसार अजूनही पालिकेच्या वैधानिक समित्यांच्या बैठका ऑनलाइन होत आहेत. मात्र रुग्णसंख्या घटल्याने पालिकेच्या सभा सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत घ्याव्यात अशी मागणी खुद्द शिवसेनेकडूनही करण्यात येत असल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले. याबाबत कार्यवाही करण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत. असे असताना भाजपच्या नगरसेवकांना दुसरे काम नसल्याने केवळ आंदोलनाचा दिखाऊपणा केला जात असल्याचे जाधव म्हणाले.

आज काय घडले

  • भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर, विनोद मिश्रा यांना न्यायालयाने स्थायी समिती बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहणाची परवानगी दिली. मात्र बैठक सुरू झाल्यानंतर अर्धा तास झाला तरी न्यायालयाचे आदेश स्थायी समितीला सादर करण्यात आले नव्हते.
  • हे आदेश प्राप्त झाल्यानंतर भाजप नगरसेवकांच्या मागणीनुसार खुद्द पालिका कायदा अधिकाऱयांनी आदेश वाचून दिलेल्या सल्ल्यानुसार संबंधित दोन नगरसेवकांना आजच्या बैठकीला बसू देण्यात आले. सर्व प्रक्रिया कायदेशीररीत्या पार पडल्याचे यशवंत जाधव म्हणाले.