
मुंबईत कोरोना झपाटय़ाने वाढत असून मार्चमध्ये एकाच महिन्यात तब्बल 96 हजार 590 बाधित आढळले आहेत. फेब्रुवारीच्या संपूर्ण महिन्यात केवळ 17 हजार 473 रुग्ण आढळले होते. म्हणजेच एकाच महिन्यात बाधितांच्या संख्येत साडेपाच पट आणि मृतांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. संपूर्ण फेब्रुवारीत मुंबईत केवळ 115 मृत्यू झाले होते, तर मार्चमधील एपूण मृतांची संख्या 230 झाली आहे.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये शिरकाव केलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे जानेवारीअखेर दैनंदिन रुग्णसंख्या 334 पर्यंत खाली आली होती. मात्र फेब्रुवारीच्या मध्यावर मुंबईत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असून एका दिवसाची रुग्णसंख्या साडेआठ हजारांवर गेली आहे. त्यामुळे पालिकेचे आव्हान वाढले आहे. रुग्णसंख्या रोखण्यासाठी पालिकेने खबरदारीच्या उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
मार्चमध्ये एकूण रुग्णसंख्येच्या 22 टक्के रुग्ण
मुंबईत 11 मार्च 2020 रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. गेल्या वर्षभरात 1 एप्रिलपर्यंत 4 लाख 23 हजार 360 रुग्ण आढळले आहेत, तर मार्चमध्ये एकाच महिन्यात 96 हजार 590 रुग्ण आढळले आहेत. मार्चमध्ये झालेली रुग्णवाढ ही एकूण रुग्णसंख्येच्या 22 टक्के आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी 515 दिवसांनी घसरला
फेबुवारीत 564 दिवस झालेला रुग्ण दुपटीचा कालावधी मार्चमध्ये थेट 320 दिवसांनी कमी होऊन 244 दिवस झाला. ही घसरण सुरूच असून एप्रिलमध्ये थेट 49 दिवसांवर आला आहे. म्हणजेच दोन महिन्यांत रुग्ण दुपटीचा कालावधी 515 दिवसांनी घसरला आहे.
पालिका बेड 25 हजारांपर्यंत वाढवणार
मुंबईत 1 एप्रिलच्या आकडेवारीनुसार 13,936 सक्रिय रुग्ण आहेत. यातील लक्षणे नसलेले आणि इतर आजार नसलेले बहुतांशी रुग्ण घरीच क्वारंटाइन आहेत. त्यामुळे पालिकेकडे 3 हजारांवर बेड रिक्त आहेत. तर वाढती रुग्णसंख्या पाहता आठवडाभरात बेडची संख्या 25 हजार करण्यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे.
फेब्रुवारी 17,473
मार्च 96,590





























































