मुंबई सेंट्रल येथे पश्चिम रेल्वेचा ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्लांट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधुनिकीकरणात आघाडी घेणाऱया पश्चिम रेल्वेने ‘पुश अॅण्ड पुल’ तंत्रज्ञान असो की सोलर पॅनलद्वारे ऊर्जानिर्मिती अशा नवनव्या क्षेत्रात झेप घेताना पर्यावरणाची काळजी घेतली आहे. आता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल येथील कोचिंग डेपोमध्ये ऑटोमेटिक कोच वॉशिंग प्लांटची उभारणी केली असून त्यामुळे दरवर्षी 18 दशलक्ष लिटर्स पाण्याची बचत होणार आहे. या नव्या वॉशिंग प्लांटमुळे अवघ्या वीस मिनिटांत 24 डब्यांची अख्खी ट्रेन धुऊन काढता येणे शक्य होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील कोचिंग डेपोमध्ये 1.67 कोटी रुपये खर्च करून ऑटोमेटिक कोच वॉशिंग प्लांटची उभारणी केली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे. या कोच वॉशिंग प्लांटमुळे वेळ, मनुष्यबळ, पाणी अशा सर्वच बाबतीत बचत होणार आहे. मानवी हाताने कोच धुण्याऐवजी ऑटोमेटिक वॉशिंग प्लांटमुळे वार्षिक 68 लाख रुपयांची बचत होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वॉशिंग प्लांटमध्ये चार उभ्या ब्रशचे युनिट आहे. एक फिक्स डिस्क ब्रशचा सेट आहे, एक पुढे मागे होणाऱया डिस्क ब्रशचा सेट आहे. शेवटी खळखळून धुण्याच्या ‘रिन्स टॉवर’च्या दोन जोडय़ा असून त्यात ब्लोअरही आहे.

60 टक्के पाण्याची बचत

मॅन्युअल वॉशिंगपेक्षा ऑटोमेटिक वॉशिंगमुळे 60 टक्के पाण्याची बचत होणार आहे. त्या वार्षिक 18 दशलक्ष लिटर्स स्वच्छ पाण्याची बचत होणार आहे. ( हे पाणी 365 नागरिकांची वर्षभराची स्वच्छ पाण्याची गरज भागविण्याएवढे आहे.) 24 डब्यांची एक गाडी 20 मिनिटांत धुऊन काढता येणे शक्य होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा वॉशिंग प्रकल्प पर्यावरणस्नेही असून ट्रेन देखभालीत आधुनिकीकरणाचे पुढचे पाऊल ठरला आहे.