ठाणे – कळव्यात संतप्त प्रवाशांचे आंदोलन, ट्रॅकवर उतरून एसी लोकल रोखली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळवा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी प्रवाशांनी आंदोलन केले. संतप्त प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून एसी लोकल रोखून धरली. यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. प्रवाशांच्या आंदोलनाची माहिती मिळताच आरपीएफ आणि जीआरपीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बळाचा वापर करून गर्दी बाजूला केली. तसेच सात प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले.

कळवा कार शेड इथून ज्या लोकल निघतात पुढे त्या ठाणे ते सीएसएमटीला जातात. त्यात कळव्यातील अनेक प्रवासी बसून पुढे येतात. मात्र आता यापैकी एक लोकल एसी लोकल म्हणून धावणार आहे. त्यामुळे कळव्यातील प्रवाशांना त्यात चढता आले नाही. त्यामुळे प्रवासी आक्रमक झाले आणि त्यांनी ट्रॅकवर उतरून एसी लोकलचा रस्ता अडवला.

पाचवा, सहावा ट्रॅक करून देखील कळवा इथून लोकल सुटत नाही, तसेच फास्ट लोकलही थांबत नाही. त्यामुळे ठाणे प्रमाणे कळवा इथून देखील लोकल सुरू करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच यासाठी आधी देखील लोकलसाठी आंदोलने झाली, मात्र आज एसी लोकल बघून प्रवासी संतापले आणि त्यांनी एसी लोकल रोखली. शेवटी रेल्वे पोलिसांनी बळाचा वापर करून प्रवाशांना ट्रॅकवरून हटवले आणि वाहतूक पूर्ववत केली.

दरम्यान, स्वातंत्र्यदिनी मध्यरेल्वेने 19 ऑगस्टपासून 10 बिगर एसी लोकल एसी लोकलमध्ये बदलण्याची घोषणा केली होती. एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांनी याचे स्वागत केले असले तरी बिगर एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांनी प्रवाशांनी आक्षेप घेतला आहे. एसी लोकल वाढल्यामुळे इतर बिगर एसी लोकलला प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होते असे प्रवाशांनी म्हटले.