
सामना प्रतिनिधी। मुंबई
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने 22 जागांची मागणी केल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते चक्रावून गेले आहेत. आम्ही तुमच्यासाठी जागा सोडणार की तुम्ही आमच्यासाठी जागा सोडणार आहात, असा सवाल काँग्रेसच्या वतीने आजच्या बैठकीत केल्याचे समजते. त्यामुळे विरोधकांच्या महाआघाडीत सामील होण्याच्या हेतूबाबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता साशंकता व्यक्त करीत आहेत.
आगामी निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थांनी मंगळवारी बैठक झाली, मात्र या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर स्वतः उपस्थित नव्हते. त्यांच्या वतीने लक्ष्मण माने, अशोक सोनावणे आदी उपस्थित होते. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजिद मेमन, जीतेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.
11- 11 जागांमध्ये वाटप करायचे का?
वंचित बहुजन आघाडीने 22 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आम्हाला 22 जागा पाहिजेत अशी मागणी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे केली आहे. मात्र बहुजन वंचित आघाडीला 22 जागा दिल्या. राजू शेट्टी यांना चार जागा सोडल्या तर उर्वरीत 22 जागांपैकी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने 11- 11 जागांमध्ये वाटप करायचे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपस्थित केल्याचे सांगण्यात येते. वंचित बहुजन आघाडीने 22 जागांची अवास्तव मागणी केल्याने महाआघाडीत सामील होण्याबाबत आम्हाला साशंकता वाटते असे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता म्हणाला.
राहुल गांधींशी चर्चा
जागावाटपात बहुजन वंचित आघाडीला शरद पवार यांचा माढा मतदारसंघ, सुप्रिया सुळे यांचा बारामती व अशोक चव्हाण यांच्या नांदेडसह 22 जागा पाहिजेत. त्यामुळे जागावाटपांच्या संदर्भात प्रकाश आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीचे नेते पुढील आठवडय़ात काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे समजते.



























































