
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मधून बांधकाम क्षेत्राला सूट देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहेत. यानुसार मुंबईतील ’कंटेनमेंट झोन’ वगळून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यास मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी ज्या व्यावसायिकांनी लॉकडाऊन आधीच बांधकामाची परवानगी मिळवली आहे, अशांना काही अटींवर देण्यात आली आहे. अटींचे पालन केले नाही तर ही परवानगी रद्द करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबईतील बांधकाम क्षेत्रालाही काही अटींवर मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. मुंबईतील कंटेनमेंट झोन वगळून तसेच ज्या ठिकाणी बांधकाम सुरू करण्यास महापालिकेच्या विकास नियोजन खात्याने लॉकडाऊन आधी परवानगी दिली आहे, अशाच प्रकल्पांना काही अटी घालून ही सूट देण्यात येणार आहे.
पूल, रस्ते, नालेसफाईची कामेही मार्गी
महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक स्वरूपाचे प्रकल्प, रस्ते व पूलविषयक दुरुस्ती, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे, पर्जन्य जलवाहिन्यांची कामे, पाणीपुरवठा विषयक कार्ये, पावसाळापूर्व कामे इत्यादी कामांशी संबंधित बांधकामांनादेखील ‘लॉकडाऊन’मधून काही प्रमाणात सूट देण्यात येत आहे.
n बांधकाम करण्यासाठी मुंबई बाहेरून कामगार आणण्यास परवानगी नसेल.
n कामगारांच्या राहण्याची, स्वच्छतेची व इतर आवश्यक गरजांची व्यवस्था ही त्याच ठिकाणी करणे बंधनकारक आहे.
n कामगारांना अन्नधान्य व पाण्यासह त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध करून देणे आवश्यक.
n कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती वैद्यकीय तपासणी नियमितपणे करवून घेणे. तसेच त्या अनुषंगाने आवश्यकता भासल्यास आवश्यक ते औषधोपचार करणे.
n बांधकाम ठिकाणी कार्यरत असणाऱया सर्वांनीच ’सोशल डिस्टन्सिंग’चे काटेकोरपणे पालन करण्यासह मास्क नियमितपणे वापरणे बंधनकारक.


























































