
राज्यात गुरुवारी रात्रीपासून ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे रेल्वेने केवळ अत्यावश्यक वर्गवारीच्या प्रवाशांनाच प्रवेश देण्यासाठी स्थानकातील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग कमी केले आहेत. तसेच रेल्वे स्थानकांत जीआरपी आणि आरपीएफच्या पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.
राज्यात गुरुवार 22 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे लोकल सेवा पुन्हा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली असून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठीच सुरू राहणार आहे. केवळ सरकारी कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय उपचाराची गरज असलेले आणि दिव्यांग प्रवाशी यांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. ओळखपत्र पाहून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना लोकलचे तिकीट आणि पास विकण्याची परवानगी दिल्याचे रेल्वेच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन निर्बंधांबाबत रेल्वेच्या कर्मचाऱयांना सजग करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली.
मेट्रोही अत्यावश्यक सेवेसाठी धावणार
लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट दाखवून केवळ एका दिशेच्या लोकल प्रवासाचे तिकीट मिळणार आहे. वैद्यकीय मदतीची गरज असलेल्या रुग्णासोबत किंवा दिव्यांग प्रवाशासोबत एका सहाय्यकासह इमर्जन्सी म्हणून प्रवासाची मुभा दिली आहे. घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱया मुंबई मेट्रो वनच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो वनची सेवाही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान धावणार आहेत.
एटीव्हीएम, यूटीएस ऍपवरून तिकीट बंद
रेल्वे प्रशासनाने पहिल्या लॉकडाऊनप्रमाणे अत्यावश्यक वर्गवारीच्या प्रवाशांना रांगेने ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी स्थानकांवरील मोजकीच प्रवेशद्वारे खुली ठेवली असून अनेक प्रवेशद्वारे बंद केली आहेत. रांगा तयार करण्यासाठी बांबूची बॅरिकेट्स उभारण्यात आली आहेत. रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांमध्ये ओळखपत्र पाहून तिकीट देण्यात येणार आहे. एटीव्हीएम, जेटीबीएस तसेच यूटीएस ऍपवरून होणारी लोकलची तिकीट विक्री थांबविण्यात आली आहे.
























































