
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एकूण 9 लसीकरण केंद्रांकर मिळून 40 लसीकरण बूथ कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर राज्य शासनाच्या वतीने जे. जे. रुग्णालय हे एक केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूटकडून कोविड 19 आजारावरील ‘कोव्हिशील्ड’ लसीचे सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले असून लसीकरण करण्यात येत आहे.
या लसीकरणात पहिली लस परळ येथील केईएम रुग्णालयात उप अधिष्ठाता डॉ. मिलिंद नाडकर, शीव रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, नायर रुग्णालयात अधिष्ठाता तथा पालिकेचे संचालक डॉ. रमेश भारमल, कूपर रुग्णालयात राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कारंथ, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पी/उत्तर विभागाच्या वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) डॉ. ऋजूता बारस्कर आणि बीकेसी भव्य कोविड सुविधा केंद्रात आहारतज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना सर्वप्रथम लस देण्यात आली.
कूपरमध्ये डॉ. दीपक सावंत यांना पहिला मान
पालिकेच्या विले पार्लेच्या कूपर रुग्णालयात राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना कोरानाची पहिली लस देण्यात आली. त्यांच्यानंतर रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरांनीही लसीकरणात भाग घेतला.
या लसीसाठी नोंदणी करून दिलेल्या टोकन क्रमांकानुसार लस देण्याचे काम सुरू होते. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
लस दिल्यानंतर त्यांना निरीक्षण कक्षात नेण्यात येत होते. लसीकरणाने आम्हाला अधिक बळ आले असल्याची प्रतिक्रिया भूलतज्ञ डॉ. नयना दळवी यांनी दिली. तर हे केंद्र अवघ्या काही दिवसात उभारले असून करोनाविरोधात लढणाऱया सर्वांनाच लस घेतल्याचा फायदा होणार असल्याचे डॉ. प्रसाद पंडित यांनी म्हटले.
असे होणार लसीकरण
केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार 3 टप्प्यांत मान्यताप्राप्त लसींचे लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यात आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी उदा. स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आणि तिसऱया टप्प्यात 50 वर्षांवरील सर्व नागरिक तसेच 50 वर्षांखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या व दुसऱया टप्प्यासाठी केंद्र शासनाने ‘को-विन’ हा डिजिटल मंच विकसित केला आहे. या माध्यमातून पहिल्या व दुसऱया टप्प्यातील लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.
लस घेतल्यानंतरही मला कोणता त्रास जाणवला नाही. मी अगदी ठणठणीत असून आता कामावरही रुजू होत आहे. लसीची कोणतीही भीती वाटली नाही. लसीबाबत संभ्रम न बाळगता लसीकरण करून घ्यावे. देश आणि आपला जग लवकरच कोरोनाला हद्दपार करेल. – डॉ. जवाहर पंजवाणी, खासगी दवाखाना
या ऐतिहासिक क्षणी पहिल्याच यादीत माझे नाव आल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. सकाळी साडेसहा वाजता मला पालिकेचा एसएमएस आला. त्यानुसार मी लगेच वांद्रे कुर्ला संकुलात आलो. गेले दहा महिने आपण कोरोनाचा सामना करीत आहोत. आता लस आल्याने कोरोनाला घाबरायचा प्रश्नच नाही. – डॉ. सचिन जैन, हिंदुजा रुग्णालय
को-विन ऍप फेल
केंद्र सरकारच्या को-विन ऍपमधून लसीकरणाच्या लाभार्थींना एसएमएस गेलाच नाही. त्यामुळे डॉक्टरांसह पालिका कर्मचाऱयांचे काम वाढले. रात्री लाभार्थींच्या याद्या घेऊन त्या पालिकेच्या सर्व वॉर्डमधील वॉर रूममध्ये पाठवण्यात आल्या. वॉर रूममधून लाभार्थ्यांना फोन करण्यात आले. तसेच प्रत्येक वॉर्डमधील आरोग्य अधिकाऱयांनी लाभार्थ्यांना बल्क मेसेज पाठवले. त्यामुळे मुंबईत आज लसीकरण सुरळीत पार पडले, अशी माहिती आरोग्य अधिकाऱयाने दिली.