आज मध्यरात्रीपर्यंत पाच विमाने इंग्लंडमधून येणार, महापालिका सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळवारी मध्यरात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत इंग्लंडमधून मुंबईत एकूण पाच विमाने येणार असून यामध्ये सुमारे एक हजार प्रवासी असणार आहेत. या सर्व प्रवाशांना पालिकेने निश्चित केलेल्या हॉटेल्समध्ये आठवडाभर ठेवण्यात येणार आहे. या प्रवाशांच्या वाहतुकीसाठी ‘बेस्ट’ बसचा वापर करण्यात येईल. या ठिकाणी सर्व प्रवाशांची पाचव्या ते सातव्या दिवसापर्यंत ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करण्यात येईल. यावेळी टेस्ट निगेटिव्ह आली तरच त्यांना घरी जाण्याची परवानगी असेल अशी माहितीही पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. 23 डिसेंबरपासून युरोपमधील इटली, फ्रान्स, जर्मनी, बेल्जिअम अशा सर्व देशातून प्रवासी आल्यास त्यांना आठवडाभर पालिकेच्या क्वारेंटाइन सेंटरमध्ये रहावे लागणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.

कर्फ्यूकाळात पोलिसांसह रात्रीची गस्त!

ख्रिसमस आणि नववर्षस्वागतासाठी होणाऱया गर्दीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईत जाहीर केलेल्या ‘नाईट कर्फ्यू’मध्ये पालिका पोलिसांसोबत मुंबईत रात्रभर विशेष लक्ष ठेवणार आहे. पाचपेक्षा जास्त लोक एकत्र आढळल्यास कारवाईदेखील करण्यात येणार आहे.

फेब्रुवारी-मार्चसारखा धोका पत्करणार नाही

मुंबईत 1 फ्रेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत परदेशातून तब्बल दोन लाखांवर विमान प्रवासी आले. त्यामुळे मुंबई-महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वाढला. असा धोका यापुढे पालिका घेणार नाही. त्यामुळेच परदेशातून येणाऱया प्रवाशांबाबत विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

विमान कमचाऱयांना मोफत पीपीई कीट

  • परदेशातून येणाऱया प्रवाशांची प्राथमिक तपासणी विमानतळावर केली जाणार आहे. यासाठी विमान कर्मचाऱयांना पालिकेकडून मोफत पीपीई कीट देण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.
  • परदेशातून येणाऱया प्रवाशांसाठी याआधी जाहीर करण्यात आलेली नियमावली कायम राहणार आहे. यामध्ये 72 तासांतील कोरोना निगेटिव्ह अहवाल लागणार आहे. शिवाय त्यांच्या हातावर सात दिवस होम क्वारेंटाइन राहण्यासाठी स्टँपही मारला जाणार आहे.

नाईट कर्फ्यूमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी राहणार असली तरी अत्यावश्यक सेवेसह सर्व नियमित सुविधा, कामे सुरूच राहणार आहेत. नाईट कर्फ्यू म्हणचे लॉकडाऊन नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पालिका-प्रशासनाला सहकार्य करावे. – इक्बाल सिंह चहल, पालिका आयुक्त