
मुंबई वगळता इतर जिह्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असून कोरोनामुळे मुंबई सोडून मूळगावी गेलेले विद्यार्थी गावाकडच्या शाळेत दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबईतील शाळांमध्ये सध्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची मागणी वाढत आहे. याचा फटका शाळेच्या पटसंख्येला बसत असून भविष्यात संचमान्यतेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांची पदेही कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे.
शाळा सोडल्याचा दाखला मागणाऱयांमध्ये नववी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. नववीचे एक सत्र संपले असून मुंबईतील शाळा बंद असल्याने पाल्ल्याचे राहिलेले एक सत्र गावाकडे सुरू झालेल्या शाळेत पूर्ण करण्याचा विचार बहुसंख्य पालक करीत आहेत. मुंबईतील दहावी आणि बारावीचे वर्गही बंद आहेत. तसेच विद्यार्थ्यांना मुंबईत कोचिंग क्लासेसनाही जाता येत नाही. या परिस्थितीत केवळ ऑनलाईन शिकवणीवर अवलंबून न राहता मूळगावी सुरू झालेल्या दहावी आणि बारावीच्या वर्गांना हजेरी लावण्याकडे विद्यार्थी, पालकांचा कल दिसत आहे.
यंदाची संचमान्यता रद्द करा
कोरोनामुळे मुंबईसह काही जिह्यातील शाळा बंद आहेत. बरेच विद्यार्थी आजही शाळेच्या संपर्कात नाहीत. त्यातच वर्ष संपायला आले तरी मुंबईतील शाळा बंदच असल्याने अनेकजण शाळा सोडूनदेखील जात आहेत. याचा फटका शाळेच्या पटसंख्येला बसत असून संचमान्यतेत विद्यार्थी संख्या कमी दिसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांची पदे कमी होण्याचा किंवा अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने यंदाची संचमान्यता रद्द करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेने केली आहे.
पोस्टाने दाखला पाठवण्याची विनंती
कोरोनाच्या सुरुवातीपासूनच गावी जाऊन राहिलेले विद्यार्थी आणि पालक पोस्टाने शाळा सोडल्याचा दाखला पाठवून देण्याची विनंती करीत असल्याचे मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे प्रशांत रेडीज यांनी सांगितले. नोकरीनिमित्त बऱयाच विद्यार्थ्यांचे वडील मुंबईत आले असून विद्यार्थी मात्र कुटुंबियांसोबत गावीच राहत आहेत. वडील शाळेशी संपर्प साधून आपल्या पाल्याचा शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जात आहेत, असेही रेडीज म्हणाले.
15 जानेवारीपर्यंत मुंबईतील शाळा बंदच, महापालिकेचा निर्णय
मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालये 15 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंदच राहणार आहेत. महापालिका क्षेत्रात सध्या कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात असले तरी इतर देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आणि देशातील अन्य राज्यांमधील कोरोनाची स्थिती पाहता सध्या तरी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.



























































