लाठ्या उगारू नका, उठाबशा काढायला लावू नका; आयुक्त हेमंत नगराळे यांचे पोलिसांना आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संचारबंदी काळात नागरिकांशी सौजन्याने वागा, कोणाला उठाबशा काढायला लावू नका, कोणावर लाठीही उगारू नका, अशा सक्त सूचना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलिसांना दिल्या आहेत. अशा घटनांचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल होते. त्यामुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन होते याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले.

बंदोबस्ताचा प्लान करावा

येत्या काळात पोलिसांना खूप काम करावे लागणार आहे. रस्त्यावर असणाऱया पोलिसांच्या बंदोबस्ताचा प्लान तयार करावा. पोलीस अधिकारी ते कर्मचारी यांना आराम मिळेल याकडे लक्ष देऊन योग्य तो बंदोबस्त आखावा. तर पोलिसांनी कोणालाही टोचून बोलू नये, कोणाचीही खिल्ली उडवू नका. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही कृत्य पोलिसांनी करू नये. आता पोलिसांना पुन्हा रस्त्यावर उभे राहावे लागणार असल्याने पोलिसांनी वेळोवेळी लसीकरण करून घ्यावे. तसेच पोलीस ठाण्यात एकत्र बसून जेवण करू नये.

पासेसचे अधिकार एसीपींना

संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना पास दिले जातात. पूर्वी पासेसचे अधिकार हे पोलीस उपायुक्तांना होते, पण आता पासेसचे अधिकार हे एसीपींना असणार आहेत. एसीपी कार्यालयातून किती जणांना पासेस दिले आणि ते कोणाला दिले याची यादी ठेवली जाणार आहे. तर पोलीस उपायुक्त हेदेखील ते पासेस कोणाला दिले याचा आढावा घेणार आहेत.

काय म्हणाले आयुक्त…

रस्त्यावर असणाऱया पोलिसांनी नागरिकांशी सौजन्याने वागत त्याच्याशी संवाद साधावा. वाहनाच्या कागदपत्रांची गरज वाटल्यासच पाहणी करावी, अन्यथा कागदपत्रे तपासू नये. पोलिसांनी कायदा हातात घेऊ नये. लाठय़ा उगारू नये. काही दिवसांपूर्वीच मरीन ड्राइव्ह येथे विनामास्क फिरणाऱयांना पोलिसांनी कोंबडा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या अनुषंगाने येत्या काळात पोलिसांनी कोणालाही उठाबशा काढणे अशा घटनांचे व्हिडीओ व्हायरल होऊन पोलिसांची प्रतिमा मलीन होईल असे कोणतेही कृत्य पोलिसांनी करू नये.