
मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 1383 रुग्ण आढळले असून 69 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण रुग्णांची संख्या 56 हजार 740 झाली असून मृतांचा आकडा 2 हजार 111 वर पोहोचला आहे. दरम्यान, गेल्या एकाच दिवसांत 795 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त होणार्यांचा आकडा 25 हजार 947 वर पोहोचला आहे.
मुंबईत मृत झालेल्या 69 जणांमध्ये 47 पुरुष आणि 22 महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये 37 जणांचे वय 60 वर्षाहून जास्त होते. तर 25 मृत 40 ते 60 वर्षे वयोगटातील आणि 7 मृत 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. मृतांमधील 47 जणांना दीर्घकालीन आजारही होते अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, मुंबईत रुग्णवाढ दिसत असली तरी आतापर्यंत 25 हजार 947 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्यामुळे सध्या 28 हजार 682 अॅक्टिव्ह केसेस असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.
केईएम, कस्तुरबा, नायरमध्ये प्लाझ्मा थेरपी केंद्र
- पालिकेच्या केईएम, कस्तुरबा आणि नायर रुग्णालयामध्ये प्लाझ्मा थेरपी केंद्र सुरू करण्यास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चने परवानगी दिली आहे. यामध्ये कोरोनामुक्त झालेल्या आणि प्रकृती चांगली असलेल्या रुग्णाच्या शरीरातील रक्तातून अँटीबॉडिज मिळवल्या जाणार असून त्यांचा वापर कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी केला जाणार आहे.
- या तंत्रज्ञानात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या शरीरात निर्माण झालेली कोरोनाविरोधातील प्रतिकारशक्ती अँटिबॉडिजच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णावर उपचारासाठी वापरली जाणार आहे. या थेरपीसाठी नायर रुग्णालयात 31 जणांकडून अँटिबॉडिज मिळवण्यात आल्या आहेत तर केईएम रुग्णालयात 19 जणांकडून अँटिबॉडिज मिळवल्या जात आहेत. तर कस्तुरबा रुग्णालयात 7 आणि नायर रुग्णालय 6 जणांवर आतापर्यंत प्लाझ्मा थेरपी करण्यात आली आहे. दरम्यान, प्लाझ्मा थेरपी पालिकेच्या तीन मेडिकल कॉलेजमध्येही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.





























































