
राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे राज्यातील कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात येत आहे. गेले काही दिवस 70 हजारांच्या घरात गेलेला दैनंदिन रुग्णवाढीच आकडा 48 हजारापर्यंत खाली आला असून, कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्या वाढली आहे. आज दिवसभरात 71,736 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर मागच्या सहा दिवसात 4 लाख 42 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक 13 हजार 674 रुग्ण पुणे येथील आहेत.
कोरोनाच्या दुसऱया लाटेने महाराष्ट्राच्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागालाही विळखा घातला आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. याचे परिणाम दिसायला लागले आहेत. मुंबई, पुण्यासह ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात यायला लागली आहे.
मुंबईत आठवडाभरात रुग्णसंख्येत 3 हजारांची घट
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने लादलेल्या कठोर निर्बंधांमुळे गेल्या आठवडाभरात 7 हजार 214 वर गेलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सरासरी 3 हजारांची घट झाली असून आज दिवसभरात 3 हजार 876 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिवसभरात 9 हजार 150 कोरोनामुक्त
मुंबईत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत असून आज दिवसभरात 9 हजार 150 रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत हे प्रमाण 87 टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी 62 दिवसांवर पोहोचला आहे. तर 19 ते 25 एप्रिलपर्यंत कोरोना वाढीचा दर हा 1.09 इतका राहिला आहे.
अशी झाली घट
26 एप्रिल – 3876
25 एप्रिल – 5542
24 एप्रिल – 5888
23 एप्रिल – 7221
22 एप्रिल – 7410
21 एप्रिल – 7684
20 एप्रिल – 7214





























































