रेल्वे रुळाला हुडहुडी, खडवली-टिटवाळादरम्यान तडा

165

बोचरे वारे, वातावरणातील थंडावा आणि थंडीतील हुडहुडी ही हवीहवीशी वाटत असली तरी त्याची बाधा आता रेल्वे रुळालाही होऊ लागली आहे. खडवली-टिटवाळा दरम्यान रुळाला गुरुवारी सकाळी 8.45 च्या दरम्यान तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे पाऊण तास लेट झाली. मेल, एक्स्प्रेस तसेच लोकल गाडय़ा खोळंबल्याने ऐन गर्दीच्या वेळी कामावर जाणाऱया प्रवाशांचे अतोनात हाल झाले. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तब्बल दुसऱयांदा रूळ तुटल्याची घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गुरवली रेल्वे फाटकाजवळ सकाळी रुळाला तडा गेल्याचे गँगमनच्या लक्षात आले. या गँगमनने तातडीने ही बाब रेल्वेच्या अधिकाऱयांना कळवली. त्यानंतर काही वेळेतच रेल्वे कर्मचाऱयांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. कर्मचाऱयांनी रुळाची दुरुस्ती केल्यानंतर 9.30 च्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली. गँगमनच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

रेल्वे रूळ तुटल्यामुळे राज्यराणी एक्स्प्रेस वासिंदला थांबवली, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल आसनगाव स्थानकात बराच वेळी उभी होती. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली. मुंबईकडे जाणारी पंचवटी एक्प्रेसदेखील खर्डी स्थानकात लटकली. ऐन कामावर जाण्याच्या वेळेला हा प्रकार घडल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला, तर कामावर उशिरा पोहोचल्याने मस्टरवर लेटमार्कचा शेरा लागला होता.

इजा, बिजा आणि… 

थंडीच्या दिवसात रुळाला तडे जाण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. केवळ दैव बलवत्तर म्हणून आतापर्यंत अनेक अपघात टळले आहेत. चार दिवसांपूर्वी रविवारी टिटवाळा-खडवली दरम्यान थंडीमुळे रूळ तुटला होता. एका तरुणाच्या ही बाब लक्षात आल्याने दुर्धर प्रसंग टळला. मात्र असाच रामभरोसे प्रवास आम्ही करायचा काय, असा संतप्त सवाल प्रवासी संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष विजय देशेकर यांनी केला आहे. इजा, बिजा आणि तिजा होण्याची वाट पाहणार काय, असा प्रश्न प्रवाशांनी विचारला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या