मध्य रेल्वेच्या 12 स्थानकांवर पादचारी पुलांची सोय

13

सामना प्रतिनिधी। मुंबई

रेल्वे रूळ ओलांडताना होणारे मृत्यू रोखण्यासाठी मध्य रेल्वेला 12 रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात आणखी 10 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. गेल्या वर्षी या कामासाठी 40 कोटी रुपये मिळाले होते. त्यामुळे पुलांच्या कामांना वेग येणार आहे. विशेष म्हणजे पूल बांधण्यासाठी हार्बर मार्गावरील स्थानकांचीही निवड करण्यात आली आहे.

एल्फिन्स्टन रोड स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर पश्चिम व मध्य रेल्वेवर 44 पूल बांधण्यात आले. फेब्रुवारी 2019 रोजी सादर झालेल्या अंतरिम बजेटमध्ये 125 पादचारी पूल उभारण्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गांवरील दादर, विक्रोळी, मुलुंड, टिटवाळा, आटगाव, उल्हासनगर, कसारा, आंबिवली, वाशिंद व हार्बरवरील गोवंडी, टिळक नगर स्थानकात पादचारी पूल उभारले जाणार आहेत. याशिवाय आसनगाव, शिवडी, मुंब्रा, मस्जिद स्थानक, भांडुप, दादर, दिवा, ठाणे यासह आणखी काही स्थानकांतील पुलांच्या दुरुस्तीसाठीही निधी मिळाला आहे. पावसामुळे पादचारी पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम सध्या थांबविण्यात आले आहे, परंतु पावसाळा संपताच या पुलांच्या बांधकामास सुरुवात होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या