
बँकेतून पैसे काढणाऱया नागरिकांना हेरायचे, पैशांच्या बंडलमध्ये बनावट नोटा असल्याची बतावणी करून पैसे मोजून देतो असे सांगत हातचलाखीने नोटा लंपास करणाऱया एका सराईत भामटय़ाला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. त्याच्याविरोधात अशा प्रकारचे आठ गुन्हे दाखल आहेत.
फरिदा इलेक्ट्रिकवाला या महिलेने जे.जे.मार्ग परिसरात असलेल्या बँक ऑफ इंडिया येथून एक लाख 47 हजार इतकी रक्कम काढली. त्यावेळी तेथे असलेल्या दोघा इसमांनी फरिदा यांना हेरून तुमच्याकडील नोटांच्या बंडलमध्ये काही बनावट नोटा असल्याचे सांगितले. तुम्हाला नीट नोटा मोजून देतो असे सांगत भामटय़ाने त्या बंडलमधील 50 हजार काढून घेतले. थोडय़ा वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे कळताच फरिदा यांनी जे.जे.मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपासादरम्यान आरोपी कल्याणच्या आंबिवली येथे राहणारा असल्याचे कळताच पथकाने तेथे छापा मारून तक्की हुशेन या भामटय़ाला अटक केली. अधिक कारवाईसाठी तक्की याला जे.जे. मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.






























































