
मुंबईतल्या नशेबाजांसाठी जम्मू-कश्मीरहून चरसचा साठा पुरविणारा मुख्य ड्रग्ज सप्लायर गुल्जार अहमद खान हा मुंबई गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे. युनीट-6च्या पथकाने कश्मीरमध्ये जाऊन त्याला पकडले.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात युनीट-6 व 7च्या पथकाने पश्चिम द्रुतगती महामार्गावर दहिसर येथे एक सँट्रो कार पकडली होती. त्यात दोन पुरुष व दोन महिला होत्या. त्यांच्या कारच्या डिक्कीत पँव्हेटी करून त्यात लपवलेला 24 किलो गांजा सापडला होता. जम्मू-कश्मीरहून सँट्रो कारने तो चरस साठा मुंबईत विकण्यासाठी आणला होता. चौघांना या गुह्यात अटक केल्यानंतर युनीट-6ने कश्मीरमधील मुख्य ड्रग्ज सप्लायरचा शोध सुरू केला होता. अखेर कश्मीरच्या श्रीनगर येथील मागरमल बाग परिसरात राहणारा गुल्जार अहमद खान हाच मुंबईतील नशेबाजांसाठी चरसचा पुरवठा करणारा मुख्य सप्लायर असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार प्रभारी निरीक्षक रवींद्र सांळुखे यांच्या मार्गदर्शानाखाली पथकाने श्रीनगर गाठून गुल्जारला पकडले.
दुकान किराणा मालाचे, सप्लाय चरसचा
गुल्जार तेथे किराणा मालाचे दुकान चालवतो आणि त्या दुकानाच्या आडून चरसचा सप्लाय करतो, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. गुल्जार हा गाडय़ांमधून पेडलर्सच्या माध्यामातून मुंबईत चरसचे पार्सल पाठवायचा. त्याने आतापर्यंत किती चरसचा साठा मुंबईत पाठवला तसेच मुंबईतील किती ड्रग्ज पेडलर त्याच्या संपका&त आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत.


























































