मुंबई गुन्हे शाखेने जीव वाचवला, आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला दिले जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विषारी इंजेक्शन घेऊन मी आत्महत्या करणार आहे, असा ई-मेल मुंबई पोलीस, बँक कार्यालये, प्रसारमाध्यमांना पाठवून आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या एका 28 वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट-7 च्या पथकाने वेळीच शोधून रोखले. नोकरी गेली, त्यात डोक्यावर झालेला कर्जाचा बोजा यामुळे आलेल्या नैराशातून त्याने टोकाचा निर्णय घेतला होता, पण पोलिसांनी त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले.

गुरुवारी एका तरुणाने त्याच्या ई-मेलवरून तो विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या करणार असल्याबाबत पोलीस आयुक्त कार्यालय तसेच इतर बँक कार्यालये, प्रसारमाध्यमांच्या ई-मेलवर आला होता. सदर ई-मेल करणारा व्यक्ती हा विक्रोळी पोलीस ठाणे हद्दीत राहावयास असल्याचे समजल्याने त्याचा शोध घेण्याकरिता गुन्हे शाखा युनिट-7 ची दोन वेगवेगळी पथके तयार केली. पथकाने त्याचा विक्रोळी परिसरामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली, परंतु त्याचा मोबाईल बंद येत होता व तो त्याचे ठिकाण सतत बदलत होता. तरीदेखील इतर वेगवेगळय़ा प्रकारे तपास करून त्याचा शोध घेतला असता तो तरुण महात्मा फुले हॉस्पिटलसमोर, कन्नमवार नगर नं. 2 येथे सापडला. त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन मिळून आले नाही. मात्र त्याचा मोबाईल तपासला असता तो गुगलमध्ये ‘डेथ इंजेक्शन’ या नावाने आत्महत्येसाठी विषारी इंजेक्शनचा शोध घेत असल्याचे दिसून आले.

नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न
वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे व पथकाने त्या तरुणाला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता असे समजले की, त्याची नोकरी गेली होती व तो त्याचे कर्जाचे हप्ते भरू शकत नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून तो आत्महत्या करणार होता. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांसमक्ष समुपदेशन करून त्यास आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले.