
ताज सॅट एअर कॅटरिंगमध्ये नोकरीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी आणखी 150 जणांनी सहार पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे, तर दुसरीकडे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची बँक खाती फ्रीझ केली आहेत. घटनास्थळाहून पोलिसांनी काही लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले असून ते तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवले जाणार आहेत.
ताज सॅट एअर कॅटरिंगमध्ये नोकरीच्या नावाखाने तरुणाची फसवणूक केली जात असल्याची माहिती सहार पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनंतर वरिष्ठ निरीक्षक दिनकर शिलवटे यांच्या पथकातील पोलिसांनी अंधेरीच्या एनआयव्हीआर कॉर्पेरेशन येथील एका कार्यालयावर छापा टाकला. छापा टाकून फसवणुकीचे कॉल सेंटर उद्ध्वस्त केले होते. पोलिसांनी 13 जणांना अटक केली होती. त्यात हुसेन मोटारवाला, मोहमद अब्दुल कय्युम, शेख इम्रान अली, अजित पटवारी, अब्दुल कादिर मोटारवाला, रझिया अब्दुल मोटारवाला, शकिना सैफुद्दीन मोटारवाला हे मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या टोळीने अनेकांची फसवणूक केली असून आतापर्यंत 150 जण हे फसवणुकीची तक्रार देण्यासाठी सहार पोलीस ठाण्यात आले आहेत. रोज पाच-सात तरुण हे फसवणुकीची तक्रार घेऊन येत असल्याचे सहार पोलिसांचे म्हणणे आहे.
यूटय़ूबवर दिली बनावट जाहिरात
या टोळीने यूटय़ूबवर एक नोकरीबाबतची जाहिरात अपलोड केली होती. ती जाहिरात बनावट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याचप्रमाणे फेसबुकवरदेखील एक जाहिरात अपलोड केली होती. ती जाहिरात कोणी अपलोड केली होती आणि कोणत्या सर्व्हरवरून अपलोड झाली होती याचा तपास सहार पोलीस करत आहेत.






























































