फोन करण्याचा बहाणा करून मोबाईल लांबवला, चोरटय़ाला काही तासांतच केले गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मित्राला फोन करण्याचा बहाणा करून महिलेचा फोन चोरून पळून गेलेल्या चोरटय़ाला विलेपार्ले पोलिसांनी काही तासांतच बेडय़ा ठोकल्या. शशांत शेलार असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा मोबाईल आणि मोटारसायकल जप्त केली आहे. त्याच्याविरोधात जुहू, राबोडी, चर्चगेट रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

तक्रारदार या विलेपार्ले परिसरातील रहिवासी असून शुक्रवारी सकाळी त्या डोसा खाण्यासाठी जात होत्या. तेव्हा शशांत हा मोटारसायकलवरून तक्रारदार यांच्याकडे आला. खूप महत्त्वाचे काम असल्याने मित्राला फोन करायचा असल्याचे सांगून शशांतने मोबाईल मागितला. त्यावर विश्वास ठेवून महिलेने शशांतला मोबाईल दिला. फोन करायचा बहाणा करून शशांत मोबाईल घेऊन पळून गेला. हा प्रकार निदर्शनास येताच तक्रारदार महिलेने याची माहिती विलेपार्ले पोलिसांना दिली. महिलेच्या तक्रारीवरून विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा नोंद केला. सहायक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. तपासासाठी पोलिसांचे एक पथक तयार केले. सहायक निरीक्षक शिव भोसले यांच्या पथकाने शशांतला खार परिसरातून ताब्यात घेतले व त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त केला. चौकशीत त्याने तो मोबाईल चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. शशांत हा रेकॉर्डवरचा आरोपी असून त्याच्या अटकेने काही गुह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.