महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक, इन्स्टाग्राम फॉलोअर्सपासून सावधान

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवर महिलांना फॉलो करून त्यांच्या फोटोचे 13 हजार 500 स्क्रीनशॉट जतन करणाऱया व त्यानंतर त्यांची अश्लील छायाचित्रे आणि मजकूर तयार करून त्यांना ब्लॅकमेल करणाऱया शुभमकुमार मनोजकुमार सिंग (25) या बिहारच्या विकृत तरुणाला दहिसर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

आरोपीने इन्स्टाग्रामवर आपले फोटो अपलोड करणाऱया एका तरुणीचे अश्लील फोटो तिच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खात्यावर अपलोड झाल्याचे लक्षात आल्यावर तिने दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक होनमाने यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यासाठी सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे यांचे एक पथक तयार केले. दांडगे यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त शशी कुमार मीना, उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार व अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. महिला पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा पाटील, कुदळे, अमित पाटील, श्रीकांत देशपांडे, चिटणीस चव्हाण, सोनल म्हस्के या पथकाला घेऊन कर्नाटकातील बेल्लारी जिह्यातील सांदूर या ठिकाणी धाड घालून शुभमकुमार सिंगला अटक केली. आरोपी शुभम याने तरुण मुली व महिलांना इन्स्टाग्रामवर फॉलो करून त्यांना न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले होते. न्यूड व्हिडीओ कॉल न करणाऱया महिलांना हा विकृत आरोपी बदनामी करण्याची धमकी द्यायचा. तेव्हा इन्स्टाग्राम किंवा सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करणाऱ्या महिलांनी शुभम सिंगसारख्या फॉलोअर्सपासून सावध राहावे व ज्या महिलांना शुभम सिंग या विकृताने ब्लॅकमेल केले आहे, त्यांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रार करावी, असे आवाहन दहिसर पोलिसांनी केले आहे.