गोराई येथील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, संस्थेच्या नावाखाली चालवत होते कॉल सेंटर 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकन नागरिकांना प्रतिबंधित असलेली औषधे अर्ध्या किमतीत विक्री करण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा बोरिवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फसवणूक प्रकरणी बोरिवली पोलिसांनी पाच जणांना अटक केली. रवी लालवानी, जितेंद्र मित्तल, शबीर खान, शकील शेख आणि संतोषी संघवी अशी त्यांची नावे आहेत, तर मुख्य सूत्रधार हा फरार असून बोरिवली पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गोराई येथील एका बंगल्यात बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली. त्या माहितीची पोलिसांनी सत्यता पडताळली. उत्तर प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त वीरेंद्र मिश्रा यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक विजय माडये आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सोमवारी रात्री त्या बंगल्यात छापा टाकून बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. त्या कॉल सेंटरमध्ये एकूण 13 जण काम करत होते. कॉल सेंटर प्रकरणी पोलिसांनी रवी, जितेंद्र, शकील, शबीर आणि संतोषीला ताब्यात घेऊन अटक केली. घटनास्थळाहून पोलिसांनी लॅपटॉप, हार्ड डिस्क जप्त केले आहेत.

या टोळीने गोराई येथील एक बंगला काही दिवसांपूर्वी भाडय़ाने घेतला. त्या बंगल्यात पूर्वी कोचिंग क्लासेस चालायचे, पण लॉकडाऊननंतर कोचिंग क्लास बंद झाला. रात्री 8 नंतर त्या बंगल्यात कॉल सेंटर चालवले जायचे. या टोळीला काही अमेरिकन नागरिकांचा डेटा मिळाला होता. कॉल सेंटरमधील कर्मचारी हे अमेरिकन नागरिकांना फोन करायचे. अमेरिकेत प्रतिबंधित असलेली काही औषधे अर्ध्या किमतीत विक्री करायचे. औषधाचे पैसे ते क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घ्यायचे. या टोळीने आतापर्यंत किती जणांना औषधाचा पुरवठा केला आहे, ते औषधे कुठून घेऊन ते अमेरिकन नागरिकांना पाठवत होते, याचा तपास बोरिवली पोलीस करत आहेत. फसवणुकीच्या गुह्यात त्या पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.