गिरगावातील पांडवपुत्र टोळीतले सहा जण गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांधकाम साईटवरील सामानाचे चढउतार करण्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराकडे कामाच्या एकूण मोबदल्यापैकी 30 टक्के रकमेची मागणी करणाऱया गिरगावातील कुप्रसिद्ध पांडवपुत्र टोळीच्या सहा गुंडांना गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने गजाआड केले. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहेत.

सुरेंद्र (नाव बदललेले) याने ऑगस्ट 2019 पासून गिरगावात सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर सामानाचे चढउतार करण्याचे काम घेतले आहे. मात्र पांडवपुत्र टोळीने त्या ठेकेदाराकडे कामातून मिळणाऱया उत्पन्नातील 30 टक्के रक्कम आम्हाला दे असा तगादा लावला होता. गिरगावात, पांडवपुत्र टोळीविरोधात तक्रार देण्यात कोणी हिंमत केली नव्हती. त्यामुळे आपण काही केले तरी काही होणार अशा आविर्भावात पांडवपुत्र टोळी होती. मात्र सुरेंद्र यांनी हिंमत करीत या टोळीतील दीपक वाळेकर, सिद्धार्थ मयेकर, गणेश सूर्यवंशी, अनिल भुवड, संजय भणगे आणि जितेंद्र वैस्वीकर या सहा जणांविरोधात खंडणी मागत असल्याची गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. या तक्रारीची तत्काळ गंभीर दखल घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-2 चे प्रभारी निरीक्षक श्रीमंत शिंदे, निरीक्षक बाळासाहेब राऊत, एपीआय संतोष सांळुखे आदींच्या पथकाने त्या सहा गुंडांच्या मुसक्या आवळल्या.

बिनधास्त पुढे या…

या सहा गुंडांविरोधात व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून खंडणीविरोधी पथकाने तपास आपल्याकडे घेतला आहे. दरम्यान, सुरेंद्र यांनी तक्रार देण्यासाठी जसा पुढाकार घेतला त्याप्रमाणे पांडवपुत्र टोळीने कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास न घाबरता त्यांच्या विरोधात तक्रार देण्यात बिनधास्त पुढे या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.