कामावरून काढले म्हणून केली चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड येथील पुरीअर कंपनीच्या कार्यालयात चोरी करणाऱया दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली. मोहम्मद सोहेल मुस्तफा आलम आणि हर्ष संतोष मिश्रा अशी त्या दोघांची नावे आहेत. हर्षला कामावरून काढून टाकल्याचा राग डोक्यात ठेवून त्याने मोहम्मदच्या मदतीने कार्यालयात चोरी केली.

मालाड काचपाडा येथे असलेल्या पुरीअर कंपनीत 50 कर्मचारी काम करतात. दिवसभरात जमा होणारे पैसे हे कार्यालयातील लॉकरमध्ये ठेवतात. त्याची चावी कार्यालयाबाहेर असलेल्या मीटर बॉक्समध्ये ठेवली जाते. चार दिवसांपूर्वी कार्यालयात ठेवलेली चार लाख रुपयांची रक्कम चोरी झाल्याचे कार्यालयातील एकाच्या लक्षात आले. त्याने याची माहिती मालाड पोलिसांना दिली. मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरु केला. वरिष्ठ निरीक्षक धनंजय लिगाडे यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक नागनाथ बनसोडे, जगदाळे, तोंडवळकर, गवंड, जुवाटकर, काटे, अभंग यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा एका फुटेजमध्ये पोलिसांना हर्ष दिसला. तोच धागा पकडून पोलिसांनी तपास करत हर्षला गोरेगाव परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत मोहम्मदचे नाव समोर आले. त्या दोघांना पोलिसांनी अटक केली. हर्ष हा पूर्वी त्या कंपनीत काम करत होता. त्यामुळे त्याला लॉकरच्या चावीबाबत माहिती होती.

पाच तास फिरले

मालाड आणि गोरेगाव परिसरात कोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत हे हर्ष आणि मोह्हमदला माहित होते. चोरी केल्यानंतर पोलिसांनी पकडू नये म्हणून ते दोघे पाच तास काचपाडय़ातील विविध गल्ल्यामध्ये फिरले.जेणे करून पोलीस आपल्याला पकडू शकणार नाही असे त्या दोघांना वाटले होते. चोरी केल्यानंतर ते दोघे गावी पळून जायच्या तयारीत होते.