
शहरात नोंद असलेल्या 21 लोन अप्सच्या गुह्याचा तपास आता मुंबई सायबर पोलीस करणार आहेत. ते 21 गुन्हे आज सायबर पोलिसांना वर्ग करण्यात आले असून तपासासाठी खास पथके तयार करण्यात आली आहेत.
लॉकडाऊन काळात अनेकांच्या नोकऱया गेल्यानंतर घराचे हप्ते आणि इतर खर्चासाठी अनेकांनी कर्जासाठी विविध खासगी वित्त पुरवठा करणाऱया कंपन्यांकडे अर्ज केले होते. त्याच काळात कागदपत्रे देऊन अवघ्या काही मिनिटांत कर्ज देऊ अशी सोशल मीडियावर जाहिरात करण्यात आली होती. त्या जाहिरातींना बळी पडून अनेकांनी लोन ऍप्सवरून कर्ज घेण्यास सुरुवात केली. 50 हजार रुपयांचे कर्ज देऊ असे सांगून नागरिकांना 2 ते 8 हजार रुपये इतकी रक्कम देऊन ती पठाणी स्वरूपात वसूल करण्यास सुरुवात केली. यंदाच्या वर्षात वसुलीसाठी लोन ऍप्सशी संबंधित असलेल्या कंपन्यांनी कर्जदाराची बदनामी अधिक जोरात केली, त्या बदनामीचा पहिला बळी मालाड येथे गेला. कर्ज घेतले नसतानाही बदनामी होत असल्याने तरुणाने आत्महत्या केली होती. त्याची दखल मुंबई पोलिसांनी घेतली. मुंबईत दाखल असलेल्या 21 गुन्हय़ांचा तपास आता मुंबई सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पाचही प्रादेशिक विभागांत सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक आता या गुह्याचा तपास करणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले.
प्ले स्टोअर आणि व्हॉट्सऍपला लिहिले पत्र
तपासादरम्यान प्ले स्टोअरवर एकूण 103 बनावट लोन अप्स असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच 223 हे बनावट व्हॉट्सऍप नंबर असून त्याचा अन्य व्यक्ती वापर करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सायबर पोलिसांनी प्ले स्टोअर आणि व्हॉट्सऍपला पत्र लिहून कारवाई करण्यास सांगितले आहे.
कर्ज पाच हजारांचे वसुली सव्वाचार लाखांची
पाच हजार रुपयांच्या कर्जाच्या रकमेपोटी सव्वाचार लाख रुपये वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार चुनाभट्टी येथे वास्तव्याला असून मार्च महिन्यात तक्रारदार याची पत्नी आजारी पडली. पत्नीच्या उपचारासाठी तक्रारदाराला पैशाची गरज होती. त्यामुळे त्याने एक लोन ऍप डाऊनलोड करून 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला.
अर्ज केल्यावर तक्रारदार याने आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील ऍपवर अपलोड केला. 90 दिवसांत कर्ज पुन्हा परतफेड करावे लागेल असे तक्रारदाराला सांगण्यात आले. तक्रारदाराला 50 हजार रुपयांऐवजी फक्त पाच हजार रुपयांचे कर्ज आले. त्यानंतर त्याला विविध नंबरवरून फोन येऊ लागले. एकाने तक्रारदारराला मोबाईलवर लिंक पाठवून पैसे जमा करण्यास सांगितले. पैसे जमा केल्यानंतरदेखील तक्रारदाराला धमकीचे फोन येत होते. वारंवार येणारे कॉल, मेसेजमुळे त्रस्त तक्रारदाराने सव्वाचार लाख रुपये जमा केले. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.






























































