
सामना प्रतिनिधी । मुंबई
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या सायबर सेल ने पर्दाफाश केला आहे. बिपीन राजपालसिंग यादव आणि मोहिद राकेशकुमार यादव अशी त्या दोघांची नावे आहेत. या टोळीने मुंबईमधील एका प्रसिद्ध कंपनी च्या नावाने बनावट ईमेल पाठवले होते. त्या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या वर्षी या टोळीने मुंबईमधील एका प्रसिद्ध कंपनीच्या नावाखाली तरुणांना बनावट ईमेल पाठवले होते. प्रोसेस फीसच्या नावाखाली तरुणांकडून पैसे घेण्यात आले होते. पैसे बँक खात्यात जमा होताच आरोपींनी पळ काढला होता. फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्याचा तपास सायबर सेलचे अधिकारी करत होते. तो मेल दिल्लीतून आल्याचे तांत्रिक माहितीत उघड झाले. त्यानंतर सायबर सेलचे पोलीस दिल्लीला गेले होते. तेथून पोलिसांनी बिपीन आणि मोहिदला ताब्यात घेतले. त्या दोघांना ट्रान्झिस्ट रिमांड वर मुंबईमध्ये आणण्यात आले. या टोळीने मुंबईसह अन्य राज्यांतील तरुणाची नोकरीच्या नावाखाली फसवणूक केल्याचे उघड झाले. बनावट लेटर हेडचा वापर ही टोळी करत होती. त्या दोघांकडून पोलिसांनी मोबाईल, सिमकार्ड, राउटर, मॉडेम, डिजिटल रेकॉर्डर व्हिडीओ सिस्टिम आणि काही कागदपत्रे जप्त केली आहे. दोघांच्या चौकशीत काही आणखी नावे समोर येणार आहेत.


























































