सायबर भामटय़ांकडून आता पार्सलच्या नावाने सापळा, पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने कारवाईची भीती दाखवत फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही अमली पदार्थ तसेच बेकायदेशीर वस्तूंचे पार्सल परदेशात पाठविल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. सदरचा गुन्हा हा मनिलॉण्डरिंगचा असल्याने सीबीआय चौकशी  सुरू असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक करणारा सायबर भामटा सायबर पोलिसांच्या हाती लागला आहे.

किरण (नाव बदललेले) यांना 8 जानेवारी रोजी एक कॉल आला होता. कॉलरने फेडेक्स कुरीअर कंपनीतून बोलत असल्याचे भासवून तुम्ही अमली पदार्थ व बेकायदेशीर वस्तूंचे पार्सल तैवान या देशात पाठविल्याने तुमच्याविरोधात तक्रार नोंद झाल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा किरण यांना कॉल आला व कॉलरने मुंबई पोलीस अधिकारी असल्याची ओळख सांगून तुमचे बेकायदेशीर कुरीअरचे प्रकरण आमच्याकडे तपासाकरिता असल्याचे खोटे सांगितले. तसेच त्या भामटय़ाने किरण यांना बनावट ओळखपत्र पाठवून सदरचा गुन्हा हा मनी लॉण्डरिंगचा असल्याने त्याची सीबीआयमार्फत चौकशी सुरू आहे. त्यासंबंधीची सीबीआयची बनावट सरकारी करारपत्रेदेखील त्याने किरण यांना पाठविली. त्यानंतर आरोपींनी कारवाई होऊ द्यायची नसल्यास किरण यांना 14 लाख 36 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडून फसवणूक केली होती.

दरम्यान, आपण कुठलेही पार्सल पाठविले नसून आपली फसवणूक होत असल्याचे किरण यांच्या लक्षात येताच त्यांनी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी त्यांनी तक्रार दिल्यानंतर उपायुक्त बाळसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सुवर्णा शिंदे, निरीक्षक मंगेश मजगर, सपोनि अमित उत्तेकर, उपनिरीक्षक अजय पाटील व पथकाने तत्काळ तपास सुरू करून किरण यांची फसवणूक झालेल्या रकमेपैकी 13 लाख 98 हजार रुपये गोठविण्यात आली. त्यानंतर शिताफीने तपास करून काwशल बाबूलाल माळी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून तब्बल 43 सीमकार्ड हस्तगत करण्यात आले.