मुंबईच्या डबेवाल्यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेहमीच मराठी माणूस, मराठी कामगार वर्ग आणि डबेवाल्यांच्या पाठीशी उभे राहिली आहे. त्यामुळे भविष्यातही डबेवाल्यांचे प्रश्न शिवसेना मार्गी लावेल, असा विश्वास असल्यामुळे मुंबई डबेवाला असोसिएशनने लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.

  शिवसेना नेहमीच मराठी माणसांचे हित जपण्यासाठी सर्व क्षेत्रातील आघाडीवर काम करत आली आहे. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे हेही ठामपणे डबेवाल्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत डबेवाल्यांना डबेवाला भवन दिले आहे. काही रेल्वे स्थानकांबाहेर नवीन सायकल स्टॅण्ड दिले आहेत. त्यामुळे मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या मागे कालही उभे होते, आजही उभे आहेत आणि भविष्यातही शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. मुंबईच्या डबेवाल्यांनी महाआघाडीला पाठिंबा दिल्याचा परिणाम मुंबई आणि उत्तर पुण्यातील भागांत नक्कीच जाणवेल, असे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.