
सुमारे एक लाख कोटी रुपये करून बांधण्यात येणाऱया महत्त्वाकांक्षी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. त्यानंतर सुमारे 50 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून वसई-विरार आणि सी लिंकच्या माध्यमातून नरीमन पॉइंट ते दिल्लीपर्यंतच्या प्रवासाचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला.
सीआयआयने ‘संकल्पातून सिद्धी’ या विषयावर आयोजित परिसंवादात नितीन गडकरी बोलत होते. मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू या शहरांना जोडणाऱया प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाच्या प्रकल्पासाठी लागणारे पोलाद व सिमेंटवरील राज्याचा जीएसटी माफ करावा अशी विनंती आपण महाराष्ट्र सरकारला केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा पश्चिमेकडील बायपास रस्ता आणि पुणे रिंग रोडच्या माध्यमातून मुंबई आणि बंगळुरू ही शहरे थेट जोडण्याच्या योजनेची माहितीही यावेळी नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. या रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल. पुणे-संभाजीनगर या शहरादरम्यानच्या रस्ते प्रवासाचा कालावधी दोन तासांनी कमी होईल. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे काम हाती घ्यावे अशी मागणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या नव्या रस्त्यांच्या मार्गावरील पुणे, संभाजीनगरच्या जवळ नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन शहरे वसवण्यासाठी आखणी करण्याची सूचना नितीन गडकरी यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारला केली.
मुंबई-पुण्यातील वायुप्रदूषणात घट
सुरत-नाशिक-नगर-सोलापूर या नव्या रस्त्याचे रंरेखन (अलाइनमेंट) झाले असून या रस्त्यामुळे देशाच्या उत्तरेतून दक्षिणेकडे येणाऱया वाहतुकीपैकी 50 टक्के वाहतूतक अन्य मार्गाने वळवता येईल. त्यामुळे मुंबई, ठाणे व पुण्यातील वायुप्रदूषणात घट होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
इथेनॉल फायदेशीर
सुमारे 115 रुपये प्रतिलिटर दराने मिळणाऱया पेट्रोलपेक्षा 64 रुपये लिटर दराने मिळणाऱया इथेनॉलचा वापर करणे जनतेसाठी किफायतशीर ठरेल. शहराअंतर्गत वाहतुकीच्या खर्चात कपात करण्यासाठी ट्रॉली बसचा वापर करण्याची शक्यता अजमावून पाहायला हवी, अशी सूचनाही नितीन गडकरी यांनी यावेळी केली.



























































