प्रत्येक कपडय़ाची असते गोष्ट! आता सर्वसामान्यही वापरू शकतात महागडे, डिझायनर ड्रेस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सणासुदीला किंवा लग्नसोहळ्याला डिझायनर कपडे घालावे असे अनेकांना वाटते. पण प्रत्येकाच्या खिशाला ते परवडतीलच असे नाही. त्यामुळे सामान्यांची डिझायनर, महागडय़ा कपडय़ांची हौस पूर्ण व्हावी, म्हणून प्रसिद्ध गीतकार मंगेश कांगणे यांनी हटके उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी दोघा मित्रांच्या मदतीने टीसीएस-द क्लोथ स्टोरीज हा नवीन ब्रॅण्ड सुरू केलाय. याचे वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये तुमच्या आवडीचे डिझायनर कपडे कमी दरात भाडेतत्वावर मिळतात, तेही अगदी काहीही डिपॉझिट न भरता प्रत्येक कपडय़ाला गोष्ट असते, तीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न मंगेश कांगणे यांनी त्यांच्या ब्रॅण्डमधून केलाय.

टिक टिक वाजते डोक्यात, सूर निरागस हो अशा अनेक लोकप्रिय गाण्यांचे गीतकार मंगेश कांगणे आहेत. गीतलेखनाच्या व्यस्त श्येडय़ुलमधून वेळ काढत त्यांनी टीसीएस-द क्लोथ स्टोरीज हा ब्रॅण्ड सुरू केला. यामध्ये भूषण चौधरी आणि आदित्य डुडकेकर हे त्यांचे भागीदार आहेत. या ब्रॅण्डच्या निमित्ताने या तिघांनीही अनेक ठिकाणच्या वैशिष्टय़पूर्ण कपडे मार्पेटला भेट दिली आहे. त्यांनी फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रातील नवीन टॅलेंटला आपल्या टीमशी जोडून घेतले. अनेक नवोदित डिझायनर त्यांच्या प्रोजेक्टसाठी ड्रेस बनवतात, अशा मुलांशी संपर्क साधून कांगणे यांच्या टीमने ड्रेस मिळवले. त्याबदल्यात त्यांना मोबदलाही दिला जातो. याशिवाय काही नामांकित डिझायनरहीदेखील टीसीएसशी जोडले गेले आहेत. त्यांनी रेड कार्पेटसाठी तयार केलेले ड्रेसदेखील टीसीएसच्या स्टॉकमध्ये आहेत. साधारणपणे 20-40 हजारांपर्यंतचे ड्रेस अगदी अडीच ते तीन हजारांपर्यंतच्या माफक दरात भाडेतत्वावर मिळतो. मॅचिंग ज्वेलरी आणि चप्पलदेखील निशु:ल्क दिले जात आहेत.

प्रत्येक कपडय़ाची एक गोष्ट असते. माझा मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचा सूट आम्ही आजही जपून ठेवलाय. मुली पहिल्या पगारातून आईसाठी साडी विकत आणतात. तसेच आईचा शालू शाळेच्या गॅदरिंगमध्ये वापरतात. प्रत्येक कपडय़ाची अशी गोष्ट असते. अशा वेगवेगळ्या थीमवर येत्या काही दिवसांत आमचा ब्रॅण्ड आणखी विस्तारेल. – मंगेश कांगणे, गीतकार

  • 13 नोव्हेंबर 2020 रोजी टीसीएस ब्रॅण्डचा शुभारंभ झाला आणि अवघ्या दोन महिन्यांत याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला महिलांच्या गाऊनपासून या प्रोजेक्टला सुरुवात झाली आहे. मात्र लवकरच मुले आणि मोठय़ांसाठी कपडे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रीवेडींगसाठी एक महिला तीन -तीन ड्रेस भाडेतत्वावर घेऊन जात आहे, तेही कोणतीही जाहिरात न करता, केवळ माऊथ पब्लिसिटीने.
  • सध्या टीसीएस- द क्लोथ स्टोरीजची सर्विस मुंबई, पुणे, संभाजीनगर अशा 15 शहरांत पुरवली जात आहे. त्यासाठी 25 सिटी एक्झिक्युटिव्ह काम करत आहेत.