
धारावीत कोरोनाची संख्या नियंत्रणात आली असली तरी माटुंगा लेबर कॅम्प, कुंभारवाडा, काळा किल्ला आणि कोळीवाडा येथे अजूनही काही ठिकाणी कोरोना रुग्ण सापडत असल्यामुळे या दाट वस्त्यांमध्ये पुन्हा घरोघरी जाऊन सर्वेक्षण तसेच स्क्रिनिंग मोहीम राबवली जाणार आहे. मात्र, धारावीतील रुग्णसंख्या अजूनही एक आकडी ठेवण्यात पालिकेला यश आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत ‘मिशन धारावी’ राबवण्यात आले. दाट वस्ती असून पालिका आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनावर नियंत्रण ठेवणे हे शक्य झाले. ट्रेसिंग, र्ट्र्रकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या चतुःसूत्रीवर आधारलेला धारावी पॅटर्न यशस्वी झाले. याची दखल जागतिक पातळीवर वेळोवेळी घेण्यात आली आहे. मात्र, अजूनही धारावीतील चार भागांत कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी आणखी कठोरपणे पावले उचलण्यात येत आहेत. यात माटुंगा लेबर कॅम्प, कुंभारवाडा, काळा किल्ला आणि कोळीवाडा यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या 13 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये या चार भागांचा समावेश होता.
स्थलांतरित मजूर, आरोग्य सेवकांना कोरोना
पालिकेच्या जी/उत्तर विभागांत दादर, माहीम आणि धारावीचा समावेश आहे. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. मात्र, काही भागांमध्ये अधूनमधून कोरोना रुग्ण सापडत आहेत. हे खास करून दाट वस्त्यांमध्ये घडत आहेत. या वस्त्यांमध्ये आता जे कोरोना रुग्ण सापडत आहेत त्यात परराज्यांमधून पुन्हा मुंबईत आलेले स्थलांतरित मजूर आणि आरोग्य सेवकांनाचा समावेश आहे, अशी माहिती जी/उत्तरचे साहाय्यक अधिकारी किरण दिघावकर यांनी दिली.
आता केवळ 84 सक्रिय रुग्ण
धारावीत आज केवळ 6 रुण सापडले असून आतापर्यंत 2 हजार 711 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 2 हजार 367 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, आता केवळ 84 सक्रीय रुग्ण राहिले असून त्यांच्यावर विविध कोरोना सेंटर्सवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत धारावीत दरदिवशी 10 पेक्षा कमी रुग्ण सापडत आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग 406 दिवसांवर पोहोचला असून त्याची सरासरी टक्केवारी ही 0.23 वर पोहोचली आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 87 टक्क्यांवर पोहोचले आहे.


























































