72 वर्षीय आजोबांच्या डोक्यातून काढला 4 सेंटीमीटरचा टय़ूमर

ब्रेन टय़ूमरमुळे अंधत्व आलेल्या मुंबईतील 72 वर्षीय एका व्यक्तीच्या मेंदूवर जटील शस्त्रक्रिया करून तिला नव्याने जीवदान मिळाले आहे. या व्यक्तीच्या पिटय़ूटरी ग्रंथीमध्ये टय़ूमर असल्याचे निदान झाले होते.

या टय़ूमरमध्ये व्यक्तीच्या दृष्टीवर परिणाम झाला होता. परंतु, अशा स्थितीत या रूग्णावर एन्डोस्कोपीद्वारे (दुर्बिण) एंडोनसल सर्जरी करून पिटय़ूटरी ग्रंथीमधील 4 सेंटिमीटरचा मोठा टय़ूमर काढण्यात मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे.

धनसुखलाल देधीया यांना मे 2020 मध्ये त्यांना प्रोस्टेट कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. कॅन्सर असल्याचे कळल्यावर त्यांना तातडीने केमोथेरपी सुरू करण्यात आली होती, पण काही महिन्यांनी त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाल्याने त्यांना दिसणं बंद झालं होतं. दैनंदिन कामासाठीही त्यांना कुटुंबियांवर अवलंबून रहावं लागत होतं. काही कालावधीनं प्रकृती खालावल्याने त्यांना वोक्हार्ट रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथील न्यूरोसर्जन डॉ. माजदा तुरेल आणि कान-नाक-घसा तज्ञ डॉ. नीपा वेलिमुतम यांनी ही मेंदूच्या गाठीवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.

आता या रूग्णांची पकृती उत्तम असून नुकताच त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कर्करोगतज्ञांच्या मदतीने उपचार करून कॅन्सर नियंत्रणात आणला. त्यानंतर दृष्टी परत आणण्यासाठी शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. त्यानुसार एन्डोस्कोपी एंडोनेसल सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रूग्णाची कोविड-19 चाचणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानं 9 सप्टेंबर रोजीही शस्त्रक्रिया करून टय़ूमर काढण्यात आला आहे.

ते वृत्तपत्र वाचू लागले

या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूची टय़ूमर काढून टाकला आहे. त्यामुळे रूग्णाची प्रकृती आता सुधारतेय. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 4 दिवसांनी ते वृत्तपत्र वाचायला लागले, अशी माहिती डॉ. तुरेल यांनी दिली. दिसणं बंद होऊ लागल्याने मी खूपच अस्वस्थ झालो होतो. मला समोर कोण उभं आहे हे ओळखणंही मला अशक्य झालं होतं. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मला पुन्हा दृष्टी मिळाली. मला नव्याने आयुष्य दिल्याबद्दल डॉक्टरांचे आभार, अशी प्रतिक्रिया रूग्ण धनसुखलाल देधीया यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या