मुंबईतील डोंगरीत चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला; 10 जणांचा मृत्यू

73

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील डोंगरीमध्ये बाबा गल्लीतील केसरबाग या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून त्याखाली आणखी काहीजण अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि एनडीआरफच्या पथकाने बचावकार्याला तातडीने सुरुवात केली. मात्र, या परिसरात अरुंद रस्ता असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. या परिसरात अनेक जुन्या इमारती असल्याने त्यांना धोका असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली याबाबतची माहिती मिळालेली नाही.

पावसाळ्यात मुंबईतील मालाडमध्ये काही दिवसांपूर्वी भिंत कोसळल्याने या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता इमारत कोसळण्याची घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे मोठे आव्हान बचाव पथकासमोर आहे. ही इमारत धोकादायक जाहीर झाली नसल्याने इमारतीत अनेकजण राहत होते, असे स्थानिकांनी सांगितले. या घटनेमुळे मुंबईतील जुन्या झालेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या