
उच्च दाब वीजवाहिन्यांमधून वीजवहन करत असताना जेवढी जास्त वीज वाहून नेली जाते, त्याच्या घातांकाप्रमाणे वीजगळतीही वाढते. मार्चमध्ये राज्यात विजेची उच्च मागणी होती. त्यामुळे महापारेषणने तब्बल 15 हजार 846 दशलक्ष युनिटचे वहन केले होते. त्यामुळेच वीजगळतीचे प्रमाण वाढले असल्याचे महापारेषणने स्पष्ट केले आहे.
राज्यात मार्चमध्ये विजेची मोठी मागणी होती. ती पूर्ण करण्यासाठी महापारेषणनेही वीज निर्मिती केंद्रांपासून वीज वितरण कंपन्यांच्या उपकेंद्रांपर्यंत मोठय़ा प्रमाणात वीज वाहून आणली आहे. सदर वीजवहन करत असताना तांत्रिक कारणामुळे विजेची गळती होते. तसेच नवीकरणीय ऊर्जेची निर्मिती जेवढी कमी तेवढी जास्त पारेषण हानी होते. त्याचबरोबर केंद्रीय क्षेत्रातून जेवढी वीज घेतली जाते तेवढी पारेषण हानी वाढते. मार्चमध्ये राज्यात केंद्राचा वाटा 9800 मेगावॅट एवढा जास्त होता. या सर्व कारणामुळेच मार्चमध्ये 3.26 टक्के एवढी पारेषण हानी नोंदली आहे. दरम्यान, 2019-20 मध्ये महापारेषणची पारेषण हानी 3.17 टक्के होती. ती कमी करण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे 2020-21 या वर्षात ती 2.93 टक्क्यांपर्यंत खाली आली असल्याचेही महापारेषणने म्हटले आहे.


























































