मुंबईत 100 ठिकाणी पाणी तुंबणार, पालिकेचा दावा… 400 ठिकाणी उपाययोजना केल्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेकडून पावसाळापूर्व कामे वेगाने केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी या वर्षी सुमारे 100 ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. मुंबईत एकूण 497 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका होता. यातील 403 ठिकाणी पाण्याच्या निचऱयासाठी उपायोजना केल्या असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पावसाळापूर्व कामांमध्ये पालिकेकडून नालेसफाई, रस्तेदुरुस्ती केली जात असली तरी अतिवृष्टीत मुंबईत पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पालिका पाण्याच्या निचऱ्यासाठी उपाययोजना करीत असते. मात्र दरवर्षी पाणी तुंबणारी नवीन ठिकाणे तयार होत असतात. या वर्षी पाणी तुंबणाऱया 130 नव्या ठिकाणांची भर पडली आहे. पाणी तुंबू नये यासाठी सहा उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन आणि दहा मिनिपंपिंग स्टेशन्स 1 मेपासूनच कार्यान्वित करण्यात आली आहेत. तर गतवर्षीप्रमाणे मान्सूनपूर्व पावसाची शक्यता लक्षात घेता 15 मेपासून सर्व पंप सज्ज ठेवण्यात आले आहेत.

मिठी नदीच्या सफाईचे काम रखडले

पावसाळा तोंडावर आला असताना मिठी नदीतून गाळ, कचरा काढण्याचे काम फक्त 56 टक्के झाले आहे. गाळ काढण्यासाठी 31 मेची डेडलाईन आहे. त्यामुळे मिठी नदीची पूर्ण सफाई होणे कठीण बनले आहे. मिठी नदीच्या सफाईसाठी कंत्राटदार येण्यास विलंब झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र अतिवृष्टीत मिठी नदीच्या काढावर वसलेल्या रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे.

पाण्याच्या निचऱ्यासाठी 547 पंप बसवणार

पाणी साचू नये यासाठी पालिका हद्दीत आणि रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत एकूण 547 पंप बसवण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी फक्त 515 पंप होते. आताचे पंप ताशी 60 क्यूबीक मीटर ते एक हजार क्यूबीक मीटर क्षमतेचे पाणी उपसा करणारे बसवण्यात येणार आहेत. शिवाय पाणी तुंबल्याची तक्रार करण्यासाठी 1916 हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला असून पालिकेच्या वेबसाईटवरदेखील तक्रार करता येईल.

पुराची ठिकाणे नियंत्रण कक्षात ऑनलाइन लाइव्ह

  • पंप चालकांसमवेत समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्षात पंप चालक प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक पंप चालक ‘स्मार्ट फोन’द्वारे संबंधित ठिकाणाचे छायाचित्र नियंत्रण कक्षात उपलब्ध करून देईल. प्रत्येक पंप ठिकाणी पंप चालकांना दिलेल्या मोबाईल फोनचे त्या ठिकाणाशी Geo-fencing करण्यात येईल.
  • पाणी साचलेल्या ठिकाणी त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी 10 फिरती डीवॉटरिंग पंप असणारी वाहने तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येक परिमंडळ कार्यालयात प्रत्येकी एक वाहन उपलब्ध करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.

नवीन फ्लडिंग पॉइंट 2026

  • शहर 35
  • पश्चिम उपनगर 30
  • पूर्व उपनगर 65
  • एकूण 130

जुने फ्लडिंग पॉइंट

  • शहर 139
  • पश्चिम उपनगर 161
  • पूर्व उपनगर 131
  • एकूण 431