पोलीस असल्याचे सांगत महिलेला लुबाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
police

सामना प्रतिनिधी। मुंबई

पोलीस असल्याची बतावणी करून महिलेची 1 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. फसवणूक प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार या सांताक्रुझच्या कालिना परिसरात राहतात. त्या वांद्रे पश्चिम परिसरात कामाला आहेत. सोमवारी त्या नेहमीप्रमाणे बस पकडून कार्यालयात येत होत्या. माहीम कॉजवे येथे त्या उतरल्या. तेथून त्या पायी चालत ऑफिसला जात होत्या तेव्हा मोटारसायकलवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. ‘पुढे एकाची हत्या झाली आहे. आम्ही पोलीस आहोत. एवढे दागिने कशाला घातलेत? ते काढून रुमालात ठेवा’ अशी बतावणी केली. त्यांच्यावर विश्वास ठेवून महिलेने दागिने काढून रुमालात ठेवले. त्यानंतर हातचलाखी करून त्या भामटय़ांनी तेथून पळ काढला. काही अंतरावर तक्रारदार गेल्यावर त्यांनी रुमाल उघडला तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घडल्या प्रकाराची माहिती वांद्रे पोलिसांना दिली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या भामटय़ांचा शोध सुरू असल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी बोरिवली पूर्व येथे तोतया पोलिसाने वृद्ध महिलेची फसवणूक केल्याची घटना घडली होती.